बोईसर, दि. 8 : येथील शिवाजीनगर भागात सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 9 जुगार्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या जुगार्यांकडून सुमारे 17 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
शिवाजीनगर भागात असलेल्या एका मोकळ्या शेतजमिनिवर काही इसम नियमित जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती बोईसर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 6 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी सदर अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी एकुण 9 जण येथे जुगार खेळताना आढळून आले. यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत त्यांच्यावर बोईसर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल केला असुन पोलीस हवालदार एस. आर. वाकडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या जुगार्यांकडुन 17 हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
