डहाणू शहरात 4 दिवसांत 43 कोरोना पॉझिटीव्ह वाढले! नगरपरिषदेत एकवाक्यता नसल्याने, लॉकडाऊनचा प्रस्ताव रखडला !

0
5064

डहाणू शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून आता 4 दिवसांत 43 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 22 जुलै रोजी शहरात 92 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले होते. त्यातील 35 जण पूर्णपणे बरे झाले होते व 57 जणांवर उपचार चालू होते. आता 25 जुलै रोजीपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 134 वर पोहोचली आहे. त्यातील 47 रुग्ण बरे झाले असून 87 जणांवर उपचार चालू आहेत. शहरात कोरोनाच्या बाधेने आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 26 जुलैची आकडेवारी हाती येणे बाकी आहे.

तुम्हाला काय वाटते? डहाणू शहरात 7 दिवसांचे लॉक डाऊन व्हावे का?

  • होय (92%, 1,917 Votes)
  • नाही (7%, 143 Votes)
  • तटस्थ (1%, 16 Votes)

Total Voters: 2,076

Loading ... Loading ...

डहाणू शहरात 14 जुलै रोजी एकाच दिवसांत 6 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर डहाणू नगरपालिका प्रशासनातर्फे 7 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी लॉकडाऊनपूर्वीच्या खरेदीसाठी झुंबड उडवली होती. हा प्रस्ताव तत्वतः मान्य झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी कटियार यांना भेटून लॉकडाऊनची सध्या गरज नसल्याची भूमिका मांडली. त्यानंतर हा प्रस्ताव लाल फितीत अडकला. आता आरोग्य सभापती भाविक सोरठी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या किर्ती मेहता यांनी पुन्हा लॉकडाऊनची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधी संभ्रमात असल्याने जिल्हा प्रशासन देखील संभ्रमावस्थेत आहे.

नगरपरिषद सदस्यांमध्ये जनजागृतीचा अभाव:
नगरपरिषदेच्या सर्व सदस्यांची व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. ह्या कार्यक्रमातूनच एका सदस्यासह त्याच्या सर्व कुटूंबीयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. एका माजी नगराध्यक्षास व 7 कर्मचाऱ्यांना देखील संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. असे असले तरी अनेक नगरपरिषद सदस्यांनी चाचणी करण्यास नकार दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य लोकांप्रमाणेच सदस्य देखील चाचणी करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.