करोना रुग्णांवर तात्पुरता उपचार करणार्‍या खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकार्‍यांच्या विविध सुचना!

... तर अशा रुग्णालयांवर करवाई!

0
2804

पालघर, दि. 30 : सर्दी, ताप, खोकल्यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना करोना चाचणीबाबत मार्गदर्शन न करता त्यांच्यावर तात्पुरते उपचार करुन वेळ मारुन नेणार्‍या खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकार्‍यांनी विविध सुचना करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्या करोना रुग्णांचा चाचणी न करता मृत्यू झाला आहे. अशा रुग्णांनी ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते, त्याचा शोध घेऊन संबंधित रुग्णालयावर कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांसाठी जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही खाजगी रुग्णालये कोव्हीड-19 ची लक्षणे असलेल्या रुग्णांची आवश्यक तपासणी न करता उपचार करत आहेत. या तात्पुरत्या उपचारामुळे रुग्णाला 2-4 दिवस बरे वाटते, मात्र त्यानंतर त्याच्या शरीरातली ऑक्सिजन पातळी कमी होते व त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा अनेक रुग्णांचा आताच्या कालावधीत मृत्यू झालेला आहे. त्यामुळे याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सदर खाजगी रुग्णालये जबाबदार असल्याचे निदर्शनास येते.

त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे असलेला रुग्ण आपल्याकडे उपचारासाठी आल्यास त्याला नजीकच्या आरोग्य केंद्रामधून रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यास सूचित करावे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगून या चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्याला घरातील इतर व्यक्तींपासून दूर राहण्याबाबत स्पष्टपणे कल्पना द्यावी, जेणेकरुन कुटूंबातील इतर व्यक्तींना संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर तसे न केल्यास भविष्यात होणार्‍या गंभीर परिणामांची संबंधितांना जाणीव करुन द्यावी.

रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला नजीकच्या कोव्हीड काळजी केंद्रा (कोव्हिड केअर सेंटर) मध्ये दाखल होण्याबाबत सूचित करावे. तेथे राहणे, भोजन व औषधोपचार सुविधा मोफत करण्यात आली आहे. लक्षणे नसलेले रुग्ण होम क्वारंटाईन असल्यास त्यांना दोन वेळा ऑक्सिजन तपासणी करण्याचे मार्गदर्शन करावे. यासाठी गावातील आशा स्वयंसेविकांकडे पल्स ऑक्सिमिटर देण्यात आले आहेत. तसेच 6 मिनिट वॉक टेस्ट करावी व त्यानंतरही ऑक्सिजन पातळी खाली गेल्यास त्वरीत रुग्णालयात दाखल होण्याच्या सुचना द्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे.

लक्षणे असलेल्या व्यक्तींनी पहिल्याच दिवशी चाचणी केल्यास व उपचार सुरु केल्यास पुढे त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची गरजही कमी होते. त्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर चाचणी करण्याचा सल्ला देण्याचे पत्रकात म्हटले आहे.

…तर अशा रुग्णालयांवर कारवाई करणार!
दरम्यान, ज्या करोना रुग्णांचा चाचणी न करताच मृत्यू झाला आहे. अशा रुग्णांनी ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते, त्याचा शोध घेऊन संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशारा देखील सदर पत्रकातून जिल्हाधिकार्‍यांनी दिला असुन करोनाच्या या लढ्यात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.