डहाणू : ऑनलाईन मटका खेळण्याच्या आरोपाखाली 4 जणांवर पोलिसांची कारवाई

0
3161

डहाणू, दि. 31 : मागील काही दिवसांपासुन डहाणूतील विविध ठिकाणी सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई सुरु आहे. नुकतीच पोलिसांनी पळे-गावठणपाडा येथील एका जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारुन 19 जणांवर कारवाई केलेली असताना आता आणखी 4 जणांवर पोलिसांनी मटका जुगार खेळल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. तर यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

सन्नी हॉटेलच्या परिसरात असलेल्या एका गाळ्यात हा ऑनलाईन मटका जुगाराचा अड्डा सुरु होता. याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने काल, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी निलेश रामजी माच्छी (वय 37, सावटागाव, ता. डहाणू), धनेश जयवंत चव्हाण (वय 58 रा.लोणीपाडा, डहाणू), संजय अशोक गुप्ता (वय 42, रा. मल्याण, डहाणू) व संतोष लक्ष्मण माच्छी (वय 44, रा. मल्याण-काटीरोड, डहाणू) असे चार जण संगणक व मोबाईलवरुन ऑनलाईन मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याचा पोलीसांचा दावा आहे.

या कारवाईनंतर आरोपींकडून 71 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी निलेश माच्छी व धनेश चव्हाण अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.

दुकानात मोबाईल चार्जिंग करणे पडले महागात

धनेश चव्हाण हे लॉक डाऊनमुळे बेकारीची झळ बसलेले डीटीपी ऑपरेटर व आर्टीस्ट असून घरी वीजपुरवठा नसल्याने आपल्याकडील मोबाईल संबंधित दुकानात चार्जिंगला लावून निवांत बसलेले असताना पोलीस आले. त्यांनी कुठलाही गुन्हा न केल्यामुळे पळूनही गेले नाहीत. त्यामुळे पोलीसांच्या ताब्यात सापडले.