पोलीस अधिक्षकांचा कनेक्टींग पालघर उपक्रम वरिष्ठांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस कर्मचार्‍यांच्या अडचणींचा निपटारा होणार

0
2359

CONNECTING PALGHARराजतंत्र न्युज नेटवर्क
             पालघर, दि. १५ : दिवसातील १२ – १२ तास कर्तव्य बजावणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना भेडसावणार्‍या विविध अडचणींचा निपटारा करण्यासाठी पालघर पोलीस अधिक्षकांतर्फे कनेक्टींग पालघर उपक्रम सुरु करण्यात आला असुन जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनमधून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ तसेच संबंधित अधिकार्‍यांशी संवाद साधुन कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
           पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व अपर पोलीस अधिक्षक कार्यालयात कनेक्टींग पालघर उपक्रमाद्वारे व्हीडीओ कॉन्फरन्सिंग सेवा कार्यान्वित करण्यात करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेणे शक्य नसल्याने जिल्हा पोलीसांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (व्ही.सी.) हा नविन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून आठवड्यातुन एक दिवस जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी तसेच मंत्रालयीन कर्मचार्‍यांना व्हीडीओ कॉन्फरन्सिंगवर हजर ठेवुन त्या माध्यमातुन ज्या पोलीस कर्मचार्‍यांना आपले कर्तव्य बजावताना व कार्यालयीन कामकाजात येणार्‍या अडचणी, बील मंजुरी तसेच गुन्हे, अकस्मात मुत्यु व प्रलंबित प्रकरणे, प्रतिबंधक कारवाई, अवैद्य धंद्यावर केलेली कारवाईची माहिती, प्रलंबित अर्ज, प्राथमिक व विभागीय चौकशी, दोषसिद्धी व पैरवी अधिकार्‍यांची कामगिरी, पोलीस कल्याणकारी योजना, मंत्रालयीन कर्मचार्‍यांकडील प्रकरणे आदी संदर्भात येणार्‍या अडचणी समक्ष ऐकुन घेण्यात येणार आहेत. तसेच त्यावर तात्काळ संबंधितांना आदेश देऊन अडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे.
            पुर्वीप्रमाणे आपल्या अडीअडचणी संदर्भात वरिष्ठांचा अज्ञांकित कक्ष घेऊन आपल्या अडीअडचणी मांडून त्यानंतर त्यावर आदेश होत असल्याने त्यात बराच कालावधी जात असत. तर शारिरीक व मानसिक त्रास देखील होत असत. मात्र आता या उपक्रमामुळे कमी वेळात व कोणत्याही त्रासाशिवाय अडचणींचा निपटारा होणार असल्याने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असुन पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी सुरु केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पोलीस दलातुन स्वागत केले जात आहे.