तारापूर एमआयडीसीतील कंपनीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

0
1948

बोईसर, दि. ५ : तारापूर औद्यागिक परिसरात अपघातांची मालिका सुरुच असुन काही दिवसांपुर्वीच एका रासायनिक कंपनीत भीषण स्फोट होऊन 8 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका ट्रडिंग कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तारापूर एमआडीसीतील टी/101 या प्लॉटवर श्री साई इंटरप्राईजेस नावाची विविध रसायनाचा पुरवठा करणारी ट्रेडिंग कंपनी आहे. मंगळवारी (दि.4) संध्याकाळी 5.30 च्या सुमारास अचानक या कंपनीत साठा करुन ठेवलेल्या सॉल्व्हन्ट या ज्वलनशील रसायनाने पेट घेतला व बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच तारापूर औद्यागिक परिसरातील एक व पालघर औद्यागिक परिसरातील एक अशा दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा कंपनीतील कर्मचारी प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. यातील एकावर उपचार करुन घरी सोडण्यात आले. तर दुसर्‍या कामगाराला खाजगी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.