सतत गैरहजर राहत असल्याने रुग्णांचे होताहेत हाल

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 5 : तालुक्यातील सुर्यमाळ आरोग्य पथकाचे वैद्यकिय अधिकारी नीलकंठ भामरे सतत गैरहजर राहात असल्याने, तसेच येथील उपकेंद्राला वैद्यकीय अधिकारीच नसल्याने सुर्यमाळमधील संपूर्ण आरोग्य सेवाच रामभरोसे झालेली आहे. परिणामी येथील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
मोखाडा तालुका हा कुपोषण आणि बालमृत्यूबाबत सर्वदूर परिचीत आहे. येथील आरोग्य सेवेबाबत मोठा कटाक्ष पाळला जात आहे. परंतू येथील आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांच्या कामचलावू प्रवृत्तीमुळे आरोग्य सेवा खिळखिळी झाली आहे. सुर्यमाळ आरोग्य पथकाकडील वैद्यकिय अधिकारी नीलकंठ भामरे हे बहुतांश वेळी आरोग्य केंद्रात अनुपस्थित राहत आहेत किंवा आले तरी लवकर निघून जात असल्याची तक्रार ग्रामस्थ व दस्तुरखुद्द महिला ग्रामसभेने केली असून भामरे यांच्या बदलीची मागणी केली आहे.
उपकेंद्रही पोरके
सुर्यमाळ येथे आरोग्य पथकाबरोबरच उपकेंद्रही कार्यरत आहे. मात्र या केंद्राची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नसून याठिकाणी वैद्यकिय अधिकारी नेमलेले नाहीत. तर इमारतही मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे परिचारिका व हिवताप कर्मचार्यांना गृहभेटी देऊन आरोग्य सेवा द्यावी लागत आहे.

पाळी लावून चालते काम
सुर्यमाळ आरोग्य पथकाच्या कर्मचार्यांनी कामाचे दिवस ठरवून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील शिपायासह सर्व कर्मचार्यांनी कामाचे 3-3 दिवस वाटून घेतले असून आजमितीस या ठिकाणचे काम पाळ्या लावून चालविले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
याबाबत तालुका कार्यालयाशी संपर्क साधला असता संबंधित वैद्यकिय अधिकार्यांना रोज आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याची ताकीद दिली असून कर्मचार्यांनाही समज देण्याचे मासलेवाईक उत्तर तालुका वैद्यकीय अधिकारी किशोर देसले यांनी दिले आहे.
विस्तीर्ण क्षेत्र, मर्यादित सेवा
सुर्यमाळ येथे 1 आरोग्य पथक व 1 उपकेंद्र आरोग्य सेवा बजावत आहे. तथापि एवढी मोठी आरोग्य सुविधा शासनाने उपलब्ध केलेली असली तरी अस्ताव्यस्त काराभारामुळे आदिवासी रुग्णांना खोडाळा किंवा वाडा येथील आरोग्य केंद्रामध्ये धावपळ करावी लागत आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या सुर्यमाळचे कार्यक्षेत्र विस्तृत असून केवनाळे, भवानीवाडी, आम्ले अशी अनेक दुर्गम गावे संलग्न असताना आरोग्य सेवा मिळवताना रुग्णांना ओढाताण करावी लागत असल्याने कार्यक्षेत्रातून संतापाचे वातावरण पाहयला मिळत आहे.
आरोग्य सेवेतील बेबंदशाहीबाबत ग्रामपंचायत स्तरावरून पत्रव्यवहार व प्रत्यक्ष महिला ग्रामसभेने ठराव मांडूनही प्रशासनाने शुन्य कार्यवाही केली असून वरिष्ठ कार्यालयाकडून कर्मचार्यांना ढिल दिली असल्याने आरोग्यव्यवस्था अस्ताव्यस्त झाली आहे.
-संजय हमरे, सदस्य, ग्रामपंचायत सुर्यमाळ
