वसई, दि. २३: पालघर जिल्हा पोलीस दल गुन्हेगारांविरूध्द अधिक आक्रमक झाल्याचे दिसत असून आज वसई येथील स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार मंगेश सपकाळ यांनी जोगेंद्र गोपाळ राणा या इसमाचे एन्काऊंटर केले आहे.
हवालदार चव्हाण हे पोलीस नाईक मनोज संपकाळ यांच्याबरोबर राधानगर रस्त्यावरुन जात असताना त्यांच्या नजरेस जोगेंद्र दिसला. त्याच्या विरुद्ध मुंबईतील खार, कांदिवली, बांद्रा, जुहू पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, सरकारी नोकरवर हल्ला अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे जोगेंद्र याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या इराद्याने चव्हाण व संपकाळ सरसावले असताना जोगेंद्रने चव्हाण यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. जोगेंद्रचा इरादा पाहून चव्हाण यांनी स्वरक्षणासाठी स्वतःकडील पिस्तुलातून जोगेंद्रवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला इस्पितळात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. हवालदार चव्हाण यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.
ही घटना घडल्यानंतर पालघरचे पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे.