करमतारा इंजिनिअरिंग कडून 5 बोटे कापल्याबद्दल 5 हजारांची फुटकळ नुकसानभरपाई!

तारापूर एमआयडीसी – कामगारांचे मृत्यू स्वस्त, अपघात फुकट आणि शोषण सहजसाध्य!

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या जिवाशी खेळ खेळला जाणे तर सामान्य बाब आहे. अनेक मृत्यू पचवण्याची क्षमता असलेली साखळी निर्माण झाल्यामुळे ह्या कानाचा त्या कानाला पत्ता न लागता कामगिरी पार पाडली जाते. ज्यांच्या कानाला पत्ता लागेल, त्याच्या तोंडात पैशांच्या पाकिटांचे बोळे टाकण्याचा प्रयत्न केला जातो. संपूर्ण ताकदीने सत्य दडविण्याचा प्रयत्न केला जातो. शक्यतो गुन्हे दाखल होत नाहीत. कधी एखाद्या मुकादमावर गुन्हा दाखल होतो. कारखान्याच्या संचालकांवर गुन्हा दाखल करायची वेळ आलीच तरी सहज जामीन मिळेल अशी व्यवस्था करायची. आजपर्यंत उद्योजकांवर जरब बसेल अशी परिस्थिती उद्भवलेली नाही.

कंत्राटी कामगारांचे शोषण:
तारापूर एमआयडीसी परप्रांतीय मजूरांच्या जोरावर चालते. परप्रांतीय कामगारांना कुठल्याही सोईसुविधा न देता, 12 तासांच्या पाळीसाठी जुंपले जाते. त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे जोखमीची कामे करुन घेतली जातात. बहुदा ज्या कामगार संघटनेचा बाहेर फलक असतो त्याचेच कामगार पुरविण्याचे कंत्राट असते. त्यामुळे कामगाराचे प्रश्न सोडविणारा कोणी नसतोच. दुर्दैवाने अपघात घडल्यास, त्यात जखमी किंवा मृत्यू झाल्यास कामगारांना कोणी वाली नसल्याने पदरात पडेल ते पाडून घेण्याशिवाय हाती काही उरत नाही. कामगार आयुक्तालय बहुदा पाकिटे गोळा करण्यापुरते मर्यादित असावे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाला कामगारांच्या सुरक्षेचे काही देणेघेणे आहे का?
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय औद्योगिक सुरक्षेविषयी जराही गंभीर नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. वास्तविक कुठलाही अपघात झाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाला कळविणे बंधनकारक आहे. अपघाताची वर्दी संबंधित पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. अपघातग्रस्तावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने देखील पोलीसांना वर्दी दिली पाहिजे. कामगार आयुक्तांसमोर नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे असे अधिकारी विकले गेल्याशिवाय अपघातांकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही.

करमतारा इंजिनिअरिंग कडून 5 बोटे कापल्याबद्दल 5 हजारांची फुटकळ नुकसानभरपाई!

जून महिन्यामध्ये (2020) येथील करमतारा इंजिनिअरिंग समूहाच्या कारखान्यात एका 19 वर्षीय कामगाराला अपघात होऊन त्याच्या हाताची 5 बोटे कापली गेली. त्याला कायमचे अपंगत्व आले. अकबर जलाद सय्यद असे ह्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे विधवा आईसह झोपडीत रहाणाऱ्या अकबरला पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. तो कंत्राटी कामगार म्हणून करमतारामध्ये जाऊ लागला. अकबर अकुशल कामगार असताना त्याला मशिन हाताळण्याचे काम देण्यात आले. आणि काम करताना त्याच्या उजव्या हाताची 5 बोटे कापली गेली. अपघात झाल्यानंतर करमतारा व्यवस्थापनाने त्वरित पोलीस व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाला कळविणे बंधनकारक असताना तसे झाले नाही. अकबरला तृंगा हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले. तृंगा हॉस्पिटलने देखील पोलीसांना कळविले नाही. उपचार झाल्यानंतर अकबरच्या हातावर 5 हजार रुपये टेकवून प्रकरण मिटवण्यात आले.
नशीबाने परिसरातील एका समाजसेवकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने पत्रकारांना हा प्रकार कळवला व याबाबत बातम्या प्रसारित झाल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेल्या कामगार आयुक्तालयाला जागे होण्याशिवाय पर्याय उरला नाही. आता अकबरलाअपघात झाल्यापासून उपचार घेत असतानाच्या कालावधीतला कायदेशीर पगार मिळाला आहे. त्याला नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती मिळू शकेलही. तितक्यावर थांबता कामा नये. अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बेजबाबदार सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. अपघात झाला असताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या करमतारा व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तरच कामगारांचे शोषण काही प्रमाणात तरी कमी होईल.