- प्रदुषित पाणी प्यायल्याने मृत्यू झाल्याचा संशय
- नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

वार्ताहर/बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधुन बाहेर पडणार्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्या जुन्या 25 एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रा (सीईटीपी) च्या आवारात 12 ते 15 कुत्री मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीईटीपीच्या प्रदुषणामुळे या श्वानांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तारापूर एमआयडीसीतील हजारो कारखान्यांमधुन बाहेर पडणार्या प्रदुषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सालवड भागात 25 एमएलडी क्षमतेचे सीईटीपी केंद्र कार्यरत आहे. मात्र येथे क्षमतेपेक्षा जास्त प्रदुषित सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी येत असल्याने केंद्रातर्फे अतिरिक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याचा आरोप मागील अनेक वर्षांपासुन होत आहे. त्यातच काल, 29 फेबु्रवारी रोजी केंद्राच्या आवारात 12 ते 15 कुत्री मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची माहिती संबंधित विभागांना व प्रशासनास न देताच या सीईटीपीच्या व्यवस्थापकाने केंद्राच्या मागील बाजूस या मृत श्वानांना गाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या केंद्रातून कोणताही प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सहा महिन्यापूर्वीच या परिसरात 4 ते 5 म्हैशींचा मृत्यु झाला होता. मात्र साईटीपीच्या व्यवस्थापकाने म्हैशींच्या मालकांना परस्पर मोबदला देऊन प्रकरण मिटवले होते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही वर्षांपुर्वीच या सामुदायिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवून केवळ दिखाव्यासाठी व आर्थिक गैरव्यवहारासाठी हे प्रक्रिया केंद्र चालू असल्याचा आरोप याच केंद्राच्या अनेक आजी-माजी सदस्यांनी केला आहे.
दरम्यान, बोईसर एमआयडीसी परिसरात मागील वर्षभरात प्रदूषित पाणी व वायुने शेकडो चिमण्यांचा, म्हैशींचा व आता कुत्रांचा मृत्यु झाल्याने येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून निष्क्रिय प्रशासकीय अधिकारी, सीईटीपी व्यवस्थापन व उद्योजकांबाबतचा असंतोष वाढत आहे.