वनविभागाने सुट्टीच्या दिवशी केलेला लिलाव वादाच्या भोवर्‍यात

0
1890
  • जव्हार उप वनविभागातील अधिकार्‍यांच्या भूमिकेवर संशय
  • शिवाजी महाराज जयंतीदिनी केला लिलाव
संग्रहित छायाचित्र

प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : जव्हारच्या उप वनविभाग कार्यालयाने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी महाराजांना अभिवादन करणे आवश्यक असताना, तसे न करता लाकडांचा लिलाव केल्याने यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप वाडा शिवसेना उप तालुका प्रमुख कैलास सोनटक्के यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला असुन लिलाव प्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

जव्हार उप वनविभागाअंतर्गत येणार्‍या विक्रमगड तालुक्यातील देहेर्जे येथील जंगलात वनविभागाने तीन वर्षापूर्वी वृक्षतोड केली होती. या वृक्षतोडीचा माल वनविभागाच्या काष्ट आगारात आणून त्याचा नियमाप्रमाणे लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र वनविभागाने वृक्षतोडीचा माल काष्ट आगारात आणलाच नाही. त्यामुळे हा माल जंगलात पडून राहिल्याने आणि पावसात भिजल्याने या मालाची गुणवत्ता कमी झाली. असे असताना जव्हार उप वनविभागाच्या उप वनसंरक्षकांनी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लिलाव जाहीर करून मालाची विक्री केली. त्यामुळे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लिलाव करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय? असा सवाल करत कैलास सोनटक्के यांनी या लिलाव प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाणे वनसंरक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्याचप्रमाणे या लिलाव प्रक्रियेत अधिकार्‍यांचे हितसंबध गुंतल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

गेली तीन वर्ष वृक्षतोडीचा माल जंगलात पडून असताना लिलाव का केला नाही? आणि आता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लिलाव करण्याची कार्यतत्परता दाखविण्यामागे कोणाचे हितसंबध गुंतलेत? असे अनेक सवाल करत सोनटक्के यांनी ही लिलाव प्रक्रिया रद्द करून संपूर्ण लिलाव प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जव्हार उप वनविभागाचे उप वनसंरक्षक अमित मिश्रा यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.