पालघर जिल्हा परिषदेमार्फत उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार

0
2615

पालघर, दि. 15 : सन 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षात आपल्या शाळेत नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणार्‍या शिक्षकांचा आज पालघर जिल्हा परिषदेमार्फत सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, उपाध्यक्ष निलेश सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिक्षणाधिकारी (प्रा.) लता सानप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन या उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षण विभाग व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, मराठी, सामाजिक शास्त्र याबाबत कृतीशील उपक्रम, मुलींचे शिक्षण, शाळाबाह्य मुलांच्या समस्या, ज्ञानरचनावाद, कृतीतून शिक्षण, कोरोना काळात ऑफलाईन तसेच ऑनलाईन शिक्षणाची सेवा देणे व इतर अनेक विविध उपक्रम राबवण्यात आलेल्या शिक्षकांचा यात समावेश आहे.

यावेळी अध्यक्षा भारती कामडी यांनी जिल्हा परिषदेने असे उपक्रमशील शिक्षक निवडल्याबद्दल त्यांच कौतुक वाटते असे सांगून हे शिक्षकच पालघर जिल्ह्याचे नाव उंचावतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणारे शिक्षक या जिल्ह्यात आहेत हे पाहून आनंद वाटला. अशा होतकरु शिक्षकांसोबत जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी पाठीशी राहतील, अशी ग्वाही उपाध्यक्ष सांबरे यांनी दिली. जेथे विद्यार्थी संख्या कमी आहे तेथे ती वाढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे, असेही सांबरे म्हणाले.

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर अवलंबून असल्याने शहरी भागात जसे उपक्रम राबवले जातात तसे उपक्रम ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबवण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांकडे फक्त इच्छाशक्तीची जोड हवी आहे. आर्थिक पाठबळ जिल्हा परिषद कमी पडू देणार नाही. भविष्यात यामधूनच एखादा रणजितसिंग डिसले तयार होईल, अशी आशा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.