बोईसर, दि. 15 : येथील वारांगडेपैकी चुरीपाडा गावात असलेल्या एका बियरशॉपमध्ये बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोईसर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारुन एकुण 39 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काल, 14 डिसेंबर रोजी रात्री 8.25 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
बोईसर पुर्वेतील वारांगडे-चुरीपाडा येथील आयुष बियर शॉपमधुन बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी येथे छापा टाकला असता बियरशॉपच्या मागे असलेल्या स्वयंपाक खोलीत इम्पेरीअल ब्लु व्हिस्की, ब्लॅक डिलक्स, बॅग पायपर व्हिस्की तसेच देशी दारू जीएम व टँगोपंच असा एकुण 39 हजार 500 रुपयांचा बेकायदेशीररित्या विक्रीस ठेवलेला साठा आढळून आला. यानंतर पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करत सौ. भावना भिमराव चुरी नामक महिलेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(अ) नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरु आहे.