राज्यभरातील 95 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या!
संजीव जोशी / राजतंत्र मिडीया
पालघर दि. 28: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून 95 आय. पी. एस. अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये पालघरचे पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, वसई विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक राज तिलक, पालघरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निमीत गोयल यांचा समावेश असून 2012 च्या बॅचचे गौरव सिंग यांची पालघरच्या पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. विजयकांत सागर हे वसई विभागाचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत.
नवे पोलीस अधीक्षक गौरव सिंग हे सध्या राजभवन (मुंबई) येथे राज्यपालांचे परिसहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. गौरव सिंग हे अतिशय डॅशिंग पोलीस अधिकारी मानले जात असून 2014 मध्ये नागपूर जिल्ह्यात नेमणूकीस असताना त्यांनी खाण माफियांचे धाबे दणाणून सोडले होते. त्यांच्यावर त्यावेळी प्राणघातक हल्ला देखील झाला होता. त्यांच्या नियुक्तीने पालघर जिल्ह्यातील रेती माफियांच्या विरोधात फास आवळला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.