करोना अपडेट : जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8,834 वर; गेल्या 2 आठवड्यात 6 हजारांहून अधिक रुग्णांची भर

0
2220

पालघर, दि. 12 : राज्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातही करोनाचा कहर सुरु असुन आज पालघर ग्रामीणमध्ये 266 तर वसई-विरार महापालिका क्षेत्रात 754 अशा एकुण 1020 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता संपुर्ण पालघर जिल्ह्यातील (वसई-विरार महापालिका क्षेत्रासह) अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 हजार 834 वर पोहोचली असुन गंभीर बाब म्हणजे गेल्या दोन आठवड्यात यात 6 हजार 286 रुग्णांची भर पडली आहे.

पालघर जिल्ह्यात दोन आठवड्यांपुर्वी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 548 एवढी होती. तेव्हा दैनंदिन रुग्णांचा आकडा 400 ते 450 च्या आसपास होता. आता हाच दैनंदिन रुग्णांचा आकडा हजारांहून पुढे जात असल्याने जिल्ह्यातील करोना परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसत आहे. पालघर ग्रामीणमधील आजची आकडेवारी पाहिल्यास नेहमीप्रमाणे पालघर तालुक्यात आज सर्वाधिक 175 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल डहाणूत 73, तलासरीत 12 व वसई ग्रामीणमध्ये 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या आदिवासी बहूल तालुक्यांमध्ये आज एकही नविन रुग्ण आढळून आलेला नाही. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात आज 754 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात करोनामुळे प्राण गमावलेल्या एकुण रुग्णांची संख्या 1 हजार 261 वर पोहोचली असुन यात पालघर ग्रामीणमधील 329 तर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील 932 रुग्णांचा समावेश आहे.