प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : तालुक्यातील सुशिक्षित गाव असे बिरुद मिरवणार्या केळठण गावाला अंधश्रद्धेचे ग्रहण लागले आहे. गावामधील महिला पोलीस पाटीलांनी गावदेवीची बांधणी केली असून त्यामुळे गावातील लोकांना त्रास होत असल्याचे भाकीत कथाकथित भगताने वर्तवल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असुन या अंधश्रद्धे प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. यशवंत पाटील (वय 55) व विशाल पाटील (वय 20) अशी अटक आरोपींची नावे असून अन्य काही आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केळठण गावातील रहिवाशी यशवंत पाटील यांच्या कुटुंबासमोर मागील काही महिन्यांपासुन अनेक समस्या उद्भवल्याने आपले देव कुणीतरी बांधलेत या अंधश्रध्देने त्यांना पछाडले होते. देवांची सुटका करून घेण्याच्या अंधश्रध्देपोटी त्यांनी मंगळवारी (दि. 2 एप्रिल) गावामध्ये कुलदैवतांचा गोंधळ घातला होता. या गोंधळासाठी त्यांनी बाहेरगावाहून सात भगतांना बोलावले होते. रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. गोंधळादरम्यान गावातील विशाल पाटील या तरुणाने अंगात देव आल्याचे भासवून घुमायला सुरुवात केली व घुमता-घुमता त्याने पोलीस पाटील बाईने आपल्या गावदेवीची बांधणी केली आहे. त्यामुळे सगळ्याच गावाला त्रास होत आहे. या बाईने गावदेवीच्या मंदिरात दोन नारळ व त्यावर हिरवा कपडा टाकून तोडगा केला आहे, असा दावा केला. त्याच्या या दाव्यामुळे एकच खळबळ माजली व पोलीस पाटील बाई अपशकुनी आहे व तिनेच हे सारे कृत्य केल्याची चर्चा त्यावेळी घडवून आणली. ही बातमी परिसरात वार्यासारखी पोहोचल्याने बदनामी होऊ लागलेल्या पोलीस पाटील नम्रता पाटील यांना तात्काळ वाडा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली
अखेर पाटील यांच्या तक्रारीवरुन यशवंत पाटील व विशाल पाटील या दोघांसह अन्य आरोपींविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013 चे कलम 3(2), 3(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन यशवंत पाटील व विशाल पाटील यांना अटक करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद बोराडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.