पालघर : नवलीत 86 हजारांचा गुटखा पकडला

0
2603
संग्रहित छायाचित्र

पालघर, दि. 21 : शहरातील नवली (वरखुंटी रोड) भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 85 हजार 572 रुपयांचा गुटखा पकडला आहे. वरखुंटी रोडवरील एका दुकानात विक्रीसाठी या गुटख्याची साठवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी दुकानाचा मालक ब्रिजेश राजेंद्र शाहू (वय 40, रा. कुंतीनगर, नवली) याला अटक करण्यात आली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश शाहू याचे वरखुंटी रोडवरील आनंदी बस स्टॉपच्या समोरील इमारतीत दुकान आहे. या दुकानात त्याने मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन 19 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 च्या सुुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना विविध प्रकारचा तब्बल 85 हजार 572 रुपयांचा गुटखा आढळून आला.

पोलिसांनी सदर गुटख्याचा साठा जप्त करत दुकानाचा मालक ब्रिजेश शाहूवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 188,269,270 व अन्न सुरक्षा अधिनियम मानक अधिनियम 2006 चे कलम 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला त्याच रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.