पालघर, दि. 31 : पालघर पोलिसांनी नंडोरे नाका येथे एका टेम्पोमधुन 17 हजार रुपये किंमतीचा गांजा पकडला असुन याप्रकरणी दोन जणांना गजाआड केले आहे. काल, 30 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली असुन नंडोरे परिसरात विक्रीसाठी हा गांजा नेला जात होता.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इसम नंडोरे नाका येथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पालघर पोलिसांच्या पथकाने नंडोरे नाक्यावर सापळा रचून एम.एच.48/टी. 1604 या क्रमांकाच्या संशयित टेम्पोला अडवून तपासणी असता त्यात 17 हजार रुपये किंमतीचा 1 किलो 700 ग्राम वजनी गांजा आढळून आला. यानंतर पोलिसांनी गांजा व टेम्पो जप्त करत टेम्पोचा चालक रोशन आशिफ अली व अफजल नजिमुल्ला शेख अशा दोघांना ताब्यात घेत त्यांना गजाआड केले.
तसेच याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस.अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.