दि. १६: लोकशाही व्यवस्था समजून घेण्यासाठी भारतीय राज्यघटना समजून घेणे आवश्यक असल्याचा सल्ला दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी एफ. वाय. बी. कॉम. च्या विद्यार्थ्यांशी बोलताना दिला. पोलीस अटक केल्यानंतर थर्ड डिग्रीचा वापर करून पोलीस कोठडीमध्ये मारहाण करतात हा लोकांचा गैरसमज आहे; असे केल्यास पोलिसांवर देखील गुन्हा दाखल होतो. पोलीस हातकडी घालू शकत नाही; त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होते व पोलिसांवर कारवाई होते. अशी माहिती मिळाल्यानंतर मुले हरखून गेली. पुढे बोलताना सिनेमामध्ये जे दाखवले जाते त्यामुळे लोकांमध्ये व्यवस्थेविषयी गैरसमज पसरतात असे सांगून त्यासाठी व्यवस्था योग्य मार्गाने नीट समजून घेतली पाहिजे असे प्रतिपादन जोशी यांनी केले. जोशी यांनी डहाणूतील एस. आर. करंदीकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशन कोर्स मध्ये अभ्यासक्रमाचा भाग असल्याने भारतीय राज्यघटनेची ओळख करून दिली. त्याच वेळी मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि मानवी हक्कांविषयी माहिती देखील दिली.