गळफास घेऊन संपवले आयुष्य

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : पबजीच्या आहारी गेलेल्या 19 वर्षीय आदिवासी तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घडना डहाणूत घडली आहे. हेमंत झाटे असे सदर विद्यार्थ्याचे नाव असुन पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे.

मुळचा डहाणूतील रानशेत येथील रहिवासी असलेला व शिक्षणानिमित्त सध्या ईराणी रोड येथील वैभव कॉम्प्लेक्स येथे राहणारा हेमंत बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कृषी महाविद्यालयात पुढील शिक्षण घेत होता. हेमंतचे वडील चिराग मेहता यांच्या भातगिरणीमध्ये काम करत होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे हेमंतच्या शिक्षणाची जबाबदारी मेहता यांनी घेतली होती. त्यामुळे हेमंत हा मेहतांच्या वैभव कॉम्प्लेक्स येथील घरी रहावयास होता.
काही महिन्यांपासुन हेमंतला पबजी गेमचे व्यसन जडले होते. रात्री उशिरापर्यंत तो मोबाइलवर पबजी खेळायचा. त्यामुळे मेहता यांनी त्याला पबजी खेळण्यापासुन रोखत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला होता. याच कारणामुळे हेमंत नाराज होता. सोमवारी (दि.14) रात्री तब्येत बरी नाही असे सांगून हेमंत लवकर झोपण्यासाठी गेला. मात्र, तासाभरातच तो बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, अशी माहिती मेहता यांनी डहाणू पोलिसांना दिली आहे.