डहाणू शहरात काल, (29 ऑगस्ट) एका दिवसात 27 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. असे असले तरी एकूण आकडेवारी दिलासादायक आहे. 2 ऑगस्ट रोजीपर्यंत डहाणू शहरात 222 रुग्ण निष्पन्न झाले होते. त्यातील 119 रुग्णांवर उपचार चालू होते. 4 ते 13 ऑगस्ट दरम्यान लॉक डाऊन जाहीर झाले होते. पुढील 14 दिवसांत (16 ऑगस्ट रोजीपर्यंत) शहरात नव्या 108 कोरोना पॉझिटिव्हची भर पडली होती. एकूण संख्या 330 वर पोहोचून त्यापैकी 136 जणांवर उपचार सुरु होते. त्यानंतरच्या 14 दिवसांत (आज 30 ऑगस्ट पर्यंत) आणखी 95 नवे रुग्ण निष्पन्न झाले असून एकूण संख्या 425 वर पोहोचली असली तरी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची संख्या 88 पर्यंत खाली आली आहे. त्यातील 44 जण रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरीत 44 जण घरीच उपचार घेत आहेत.