
राजतंत्र न्यूज नेटवर्क :
डहाणू दि. ११: मिशन हॉस्पिटल अशी ओळख असलेले, डहाणू शहारातील ऐतिहासिक असे ब्रदरेन मिशन हॉस्पिटल आता नव्याने सुरु होत आहे. कधीकाळी डहाणू तालुक्यातील अतिशय नामांकित अशी ओळख असलेले हे हॉस्पिटल गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेले आहे. ते चालू करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले होते. पण आता चर्च ऑफ नॉर्थ इंडिया (मुंबई धर्मप्रांत) तर्फे हा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मिशन हॉस्पिटल सध्या जीर्ण अवस्थेत असून त्याची डागडूजी व नूतनीकरण करुन सर्वप्रथम येथे बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात येणार आहे. नुकताच येथे नूतनीकरणाचा शुभारंभ करणारा एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम मिशन हॉस्पिटलच्या संस्थापक डॉ. बारबरा निकी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे बिशप डॉ. प्रकाश पाटोळे, सेक्रेटरी अविनाश रंगाया, ट्रेझरर विनोद राज, चर्च ऑफ ब्रेदरेन (डहाणूरोड – पूर्व) चे अध्यक्ष संजय साळवी, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, उप नगराध्यक्ष रोहिंग्टन झाईवाला व डहाणूतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मिशन हॉस्पिटल हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आरोग्यसेवा व संदर्भसेवा देत होते. डहाणू शहरातील अनेक ज्येष्ठ डॉक्टर हे कधीकाळी मिशन हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते व मिशन हॉस्पिटलमुळेच त्यांचा डहाणूशी संपर्क आला. मात्र दरम्यानच्या काळात विविध कारणांमुळे या हॉस्पिटलला घरघर लागली. या हॉस्पिटलला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे अशी डहाणूकरांची भावना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.