वसई पंचायत समितीच्या अधिकार्‍याला अडीच लाखांची लाच घेताना अटक

0
2321

LACHवसई, दि. 28 : शाळेच्या दर्जावाढीला मान्यता मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती 5 लाखांची मागणी करणार्‍या वसई पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकार्‍याला पहिला हफ्ता म्हणून 2 लाख 50 हजारांची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. बिजेश बाकेलाल गुप्ता (वय 52) असे या लाचखोर अधिकार्‍याचे नाव असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटने ही कारवाई केली.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगावमधील सेव्हन स्वेअर अकॅडमी या शाळेला इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंत दर्जावाढ मिळावी, यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दिड महिन्यापुर्वी वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. मात्र या विभागाचे विस्तार अधिकारी बिजेश गुप्ता यांनी याकामी त्यांच्याकडे स्वत:सह इतर अधिकार्‍यांसाठी एकुण 6 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत तडजोडीअंती 5 लाख स्विकारण्याचे कबुल केले होते. यानंतर मुख्याध्यापिका यांनी 5 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करुन आज, मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात लाचखोर ब्रिजेश गुप्ता अडकला. त्याला कामाच्या फाईलसोबत 2 लाख 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुप्ता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.