11.22 लाखांची रोख रक्कम केली होती लंपास

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 31 : नालासोपारा पुर्वेतील एका पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची ग्रील कापुन कार्यालयातील 11 लाख 22 हजार रुपयांची रोकड लंपास करणार्या तीन चोरट्यांना गजाआड करण्यात तुळींज पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून चोरीला गेलेल्या रक्कमेपैकी 4 लाख 43 हजारांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पुर्वेतील संतोषभुवन येथील इंडीयन ऑईल कार्पोरेशन लि. च्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात 20 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. यावेळी चोरट्यांनी कार्यालयाचे ग्रील कापून आत प्रवेश करत 11 लाख 22 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. याबाबत तुळींज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक डॅनीयल बेन व आर. के. जाधव यांनी तुळींज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार केले होते. या पथकाने याप्रकरणी अधिक तपास करत मुंबईतील विविध भागातून महाविर जोहर सिंग (वय 32), गंगासिंग मनोहरसिंग कडेसा (वय 35) व अजयन कारीयंबु पावुरवेडु (वय 39) अशा तिघांना अटक करत त्यांची कसुन चौकशी केली असता तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून चोरीला गेलेल्या रक्कमेपैकी 4 लाख 43 हजारांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दिड लाख रुपये किंमतीची फोर्ट कंपनीची कार व गुन्हा करताना वापरेलेले साहित्य असा एकुण 5 लाख 93 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
