
प्रतिनिधी/डहाणू, दि. 9 : वंदे मातरम अंध -अपंग सेवाभावी संस्था व डहाणू तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.7) डहाणू नगर परिषदेच्या सभागृहात दिव्यांगांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डहाणूचे तहसीलदार राहूल सारंग, अध्यक्ष म्हणून विनोद अनंत राऊत, नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेचे अधिकारी मंगेश गायकर, वंदे मातरम संस्थेचे सल्लागार प्रमोद पाटील, राजन घरत, नीता राऊत, संस्थेच्या सचिव नीता मोरे, नायब तहसीलदार शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सोनाली कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रमोद पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांना महत्वाच्या योजनांची माहिती करून दिली. तर अंध व्यक्तींसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती मंगेश गायकर यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून आमची संस्था कार्यरत असून संस्थेने विविध उपक्रम गरजू लोकांसमोर मांडलेत. याबरोबरच 2019-20 या वर्षासाठी संस्थेला अनेक उपक्रम व कार्यशाळा राबवायच्या आहेत व त्यासाठी आपल्या बहुमोल सहकार्याची नितांत आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने कार्यालयीन पायाभूत सुविधांची संसाधने, संगणक, लॉकरची सुविधा असणारी कपाटे, खुर्च्या, टेबल आदींची गरज असल्याचे राऊत म्हणाले. तसेच 3 डिसेंबर रोजीच्या जागतिक अपंग दिनानिमित्त जागृकता मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असून त्याच दिवशी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी व दिवाळी सणानिमित्त अपंग व्यक्तींना घरगुती उपकरणांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर वंदे मातरम सहाय्यता गटामार्फत स्वयंरोजगार निर्मित वस्तू सामग्री विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होण्याबाबत, अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजांसाठी वस्तूंचे सहाय्य मिळवून देण्याबाबत, पर्यावरण अभ्यास दौर्यासाठी गरीब अपंग व्यक्तींना सहल उपक्रमातून व्यक्तीमत्व विकास घडून आणण्याबाबत विशेष प्रयत्न पुढील काळात करण्याचा मनोदय राऊत यांनी व्यक्त केला.
दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजने अंतर्गत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांचा लाभ मिळवून देणे, राजीव गांधी पेन्शन योजना व इतर दिव्यांगाच्या योजनांचे मार्गदर्शन व उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देणे हा उद्देश ठेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 250 दिव्यांग व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष राऊत यांनी राजतंत्रशी बोलताना सांगितले की, आजच्या कार्यशाळेसाठी आमच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील गावोगावी जाऊन जास्तीत जास्त दिव्यांगांना माहिती दिली व उपस्थित राहण्याची विनंती केली. बर्याच दिव्यांगांना कडेवर उचलून नातेवाईक कार्यशाळेत घेऊन आले. आम्ही अपंग असलो तरी सुंदर आहोत, आमचेही जीवन सुंदर आहे हे आमच्या संस्थेचे ब्रिद वाक्य आहे. मात्र या वाक्याला खरा अर्थ प्राप्त होण्यासाठी आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत, असे सांगतानाच त्यासाठी शासकीय, निम शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दिपक देसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना वंदेमातरम अंध अपंग सेवाभावी संस्था व विनोद राऊत आपले अंधत्व बाजूला ठेवून दिव्यांगांसाठी करत असलेल्या कार्याची उपस्थितांना ओळख करून दिली.