वाड्यातील शेतकर्‍याने पिकवले पिवळे कलिंगड

0
3443
  • 5 एकरातील लागवडीतून मिळणार लाखो रुपयांचे उत्पन्न
  • पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत केला नवा प्रयोग

दिनेश यादव/वाडा, दि. 8 : तालुक्यातील देवघर या छोट्याशा गावातील एका शेतकर्‍याने येथील पारंपारिक भातशेतीला फाटा देत पिवळ्या कलिंगडाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केला असून यातून सदर शेतकर्‍याला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. तर दुसरीकडे हा आगळावेगळा प्रयोग सगळ्यांच्याच कुतुहलाचा विषय बनला आहे.

वाडा तालुका हा भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे पिकविल्या जाणार्‍या ’वाडा कोलम’ या तांदळाला आजही संपूर्ण देशातील बाजारपेठेत चांगली मागणी आहे. मात्र मागील काही वर्षात भातशेतीचं अर्थशास्त्र कोलमडल्याने येथील शेतकर्‍यांना भातशेती करणं अवघड बनलंय. कायम तोट्यात जाणार्‍या भातशेतीने इथला शेतकरी पिचला गेला आहे. अशीच परिस्थिती वाडा तालुक्यातल्या देवघर गावातील प्रफुल्ल पाटील या तरुण शेतकर्‍याच्या कुटुंबियांची. पारंपरिक पध्दतीने भातशेतीची लागवड करून दरवर्षी कर्जात बुडणार्‍या आपल्या कुटुंबियांची हलाखीची परिस्थिती पाहून शेती आर्थिकदृष्ट्या परवडेल कशी? याचा कायम धांडोळा घेत वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रयोगशील शेतीची माहिती घेत देवघर येथील प्रफुल्ल पाटील या तरूण शेतकर्‍याने आपल्या 5 एकर शेतीत पिवळ्या कलिंगडाची लागवड करून पालघर जिल्ह्यात नवा प्रयोग केला. एरवी हिरवी साल आणि आतून लालभडक कलिंगड पहायची सवय असलेल्या आपणासारख्या सर्वांनाच ही पिवळी कलिंगडे खुणाऊ लागलीत. पाटील यांनी लागवड केलेल्या कलिंगडात दोन प्रकारची कलिंगडं आहेत. एका कलिंगडाची साल पिवळी आणि आतील गर लाल असलेलं आहे तर दुसरं हिरवी साल आणि पिवळा गर असलेली आहे. त्यामुळे ही कलिंगडं निश्चितपणे बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करतील, असा विश्‍वास व्यक्त केला जोतोय.

शेतीची आवड असताना देखील पारंपरिक शेतीतील अर्थशास्त्र शेतकर्‍याला शेतीपासून दूर जायला भाग पाडतेय, अशी धारणा पाटलांची बनली होती. त्यामुळे कमी साधनांमध्ये आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देणार्‍या शेतीकडे वळण्यासाठी प्रफुल्ल पाटील ठिकठिकाणच्या प्रयोगशील शेतीची पहाणी करत असत. नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत होते. अशातच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील वर्षी शेतकर्‍यांना शेतीच्या अभ्यासासाठी इस्राईलला पाठवलं. त्या गटात जाण्याची संधी प्रफुल्ल पाटलांना मिळाली. इस्राईलमधील शेतीचं तंत्रज्ञान पाहून प्रभावित झालेल्या प्रफुल्ल पाटलांनी आपल्या शेतीत प्रयोग करण्याचा एकच ध्यास घेतला. आणि झपाटल्यागत ते कामाला लागले. तंत्रज्ञानावर आधारित शेती करताना गुंतवणूकही मोठी होती. इस्राईलहून परतल्यानंतर सोसायटीकडून कर्ज घेतलं, कुटुंबियांचे दागदागिनेही गहाण ठेवून संपूर्ण 5 एकराला ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. कलिंगडाच्या लागवडीबरोबरच नेटशेड उभारून त्यात मिर्चीचीही लागवड केली. कलिंगडाचं पिक घेताना बदामाच्या व चौकोनी आकाराची कलिंगड साच्याच्या सहाय्याने तयार करण्याचा मानस त्यांचा आहे. अशाप्रकारच्या विविध आकारातील कलिंगडांना बाजारमूल्य चांगलं मिळणार आहे. हे कलिंगड नवं असल्याने बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरातील अनेक मॉलमध्ये ही कलिंगडं विक्रीसाठी जाणार आहेत. या पिवळ्या कलिंगडाच्या शेतीतून त्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. इस्राईलला पाहिलेलं तंत्रज्ञान आणि कमी पाण्यावर, कमी मनुष्यबळावर होणारी शेती पाहून आणि शांतीदूत फार्मिंगच्या तंज्ञाकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपण किफायतशीर शेतीकडे वळल्याचे प्रफुल्ल पाटील सांगतात. तर त्यांनी शेतीत केलेला हा प्रयोग पालघरमधील भात उत्पादक शेतकर्‍यांना प्रेरणा देणारा ठरत आहे.