खोडाळ्यात डॉक्टरांअभावी ‘108’ रुग्णवाहिकेला ब्रेक

0
2400
  • रुग्णांना मोजावे लागणार पैसे
  • संदर्भ सेवेचा प्रश्न गंभीर

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 7 : महाराष्ट्राची जीवनदायीनी म्हणून नावारूपास आलेली 108 रुग्णवाहिकेची सेवा केवळ डॉक्टर अभावी ठप्प झाली आहे. खोडाळा, आसे आणि मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकक्षेत ही सेवा दिली जात आहे. तथापि आसे आणि खोडाळा येथील 108 ला डॉक्टर नसल्याने तातडीचे उपचार व संदर्भ सेवेला ब्रेक लागला होता. पैकी आसे येथील अनुशेष भरला असून खोडाळ्यातील 108 ला अजूनही ब्रेकच आहे.

अत्यावश्यक उपचार किंवा संदर्भ सेवेसाठी 108 रुग्णवाहिकेची सेवा वरदान ठरलेली आहे. दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना व निष्कांचन व्यक्तींना आपत्कालीन परिस्थितीत 108 चा आधराचा हात होता. परंतू खोडाळा येथील ही रुग्णसेवा डॉक्टरांअभावी खोळंबल्याने एकूणच रुग्णांना त्याची मोठी झळ सोसावी लागणार आहे. 108 वर भारत विकास गृप (बीव्हीजी) या खासगी कंपनीचे नियंत्रण आहे. या कंपनीकडून डॉक्टरांच्या नियुक्तीबाबत दिरंगाई होत आहे. आसे येथील पद रिक्त झाल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी येथे डॉक्टर उपलब्ध करून दिल्याने येथील सेवा पूर्वपदावर आली असली तरी खोडाळा येथील सेवेसाठी डॉक्टर मिळण्याचे चिन्ह दिसत नाही.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखाली रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा (जवळील रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी) 108 च्या माध्यमातून पुरविली जाते. त्यायोगे अद्ययावत आरोग्य सेवेपर्यंत रुग्णांना सुखरुप पोहोचविण्यासाठी 108 रुग्णवाहिकेची मदत होत असते. रस्ते अपघातातील जखमी, सर्व गंभीर आजाराचे रुग्ण, गंभीर गरोदर महिला, नवजात शिशू संबंधातील आजार, साथीचे रोग, हृदयरोग, श्वसनरोग, मेंदूचे आजार या सर्व आजारांवर 108 ही आपत्कालीन परिस्थितीत मोलाचा हातभार लावीत आहे. त्यामुळे वैद्यकीय नियंत्रण मिळून रुग्णांचे प्राण वाचत आहेत. परंतु आता या सेवेलाच ब्रेक लागल्याने रुग्णांना उपचार व संदर्भ सेवेसाठी पदरमोड करून बरीच यातायात करावी लागणार आहे.

डॉक्टरांच्या नियुक्तीबाबत वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी भारत विकासच्या जिल्हा व्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संवाद होऊ शकला नाही.