प्रस्तावित नॅशनल मेडिकल कमिशनच्या विरोधात डहाणूतील डॉक्टरांनी पाळला बंद
डहाणू दि. २९: केंद्र सरकारच्या प्रस्तावित नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा (आय.एम.ए.) आक्षेप असताना विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल (२८ जुलै) देशभरातील डॉक्टर संपावर गेले होते. आय. एम. ए. च्या डहाणू शाखेतर्फे देखील बंद पाळण्यात आला. सर्व दवाखाने दिवसभर बंद ठेवण्यात आले. तातडीच्या सेवा आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले.
प्रस्तावित विधेयक गरिबांसाठी व सर्वसामान्यांसाठी असुविधा निर्माण करणारे असून ते लोकशाहीच्या तत्त्वांना बाधक असल्याचा आय. एम. ए. चा दावा आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा व वैद्यकीय शिक्षण अतिशय महाग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून वैद्यकीय सेवा व शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल, खासगी वैद्यकीय कॉलेजवर कोणाचाही धाक राहणार नाही आणि वैद्यकीय व्यावसायिकच नव्हे तर विद्यार्थ्यांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागेल. आणि म्हणून जनविरोधी कायद्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आय. एम. ए. च्या डहाणू शाखेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र तिवारी यांनी दैनिक राजतंत्रशी बोलताना केले आहे.