बोईसर, दि. 17 : बोईसरसह राज्यातील विविध भागातील पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीला बिहार राज्यातून गजाआड करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. जयनंदन उर्फ विरा असे सदर आरोपीचे नाव असुन त्याच्याबाबत माहिती देणार्यास 25 हजारांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. विशेष म्हणजे यापुर्वी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांवर जीवघेणा हल्ला करुन तो पसार झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जयनंदन हा मुळचा बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील टेहटा गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर बोईसर व अन्य काही भागात चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. बोईसर पोलीस त्याच्या मागावर असताना जयनंदन हा आपल्या मुळगावी लपून राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने टेहटा पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांना ही माहिती दिली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व टेहटा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आरोपी जयनंदनला ताब्यात घेतले. दरम्यान, यापुर्वी जयनंदनला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने धारधार हत्यारांची भिती दाखवत पळ काढला होता. तर पोलिसांनी त्याच्याबाबत माहिती देणार्यास 25 हजारांचे बक्षिस देखील जाहीर केले होते.
जयनंदनला अटक केल्याने त्याच्या चौकशीत आणखी काही गुन्हे उघडण्याची शक्यता आहे.