वाहनतळाच्या राखीव भूखंडावर परप्रांतीयांचे अतिक्रमण तारापूर एमआयडीसीमधील प्रकार; प्रशासनाची अनास्था

0
1680

वार्ताहर
बोईसर, दि. 30 : तारापूर औद्योगिक परिसरातील नियमित येणार्‍या वाहनांकरिता निर्माण करण्यात आलेल्या वाहनतळावर परप्रांतीयांचे अतिक्रमण वाढल्याने वाहने उभी करण्यात अडचण निर्माण होत आहे. याकडे औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने वाहनतळाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात आहे.
तारापूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले हे औद्योगिक क्षेत्र आशिया खंडातील सर्वात मोठे गणले जाते. येथे मोठ्याप्रमाणावर औद्योगिक कारखाने उ
भे राहिले आहेत. त्यामुळे या परिसरात मालवाहतूक करणार्‍या वाहनांची संख्याही मोठी आहे. वाहनांची रहदारी सतत सुरु असते. मालवाहू वाहनांची संख्या मोठी असल्याने पालघर – बोईसर रस्त्याच्या बाजूला पश्चिम रेल्वेच्या यार्डानजीक भूखंड क्र. एम. 37 वर 1994-95 या कालावधीत वाहनतळाची निर्मिती करण्यात आली. या वाहनतळाच्या जागेवर पृष्ठभाग देखील विकसित करण्यात आला. येथे अंदाजे 8415 चौ. मी. जागेत ट्रक टर्मिनल उभारण्यात आला. याकरिता महामंडळाने सुमारे 48 लाख रुपये निधी खर्च केला आहे. त्यानंतर हे ट्रक टर्मिनल भाडे तत्वावर देऊन कार्यन्वित केले होते. मात्र सद्यस्थितीत या ट्रक टर्मिनल चालविण्याकडे प्रशासनाने अनास्था दाखविल्याने ते बंद स्थितीत असल्यागत आहे. त्यामुळे या जागेवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांनी अतिक्रमण करून तात्पुरत्या झोपड्या उभारल्या आहेत.
त्याचप्रमाणे या जागेत 11 व्यवसायिक गाळे बांधण्यात आले असून त्यामध्ये दुकाने थाटली गेली आहेत. तसेच या भूखंडाच्या जवळ असलेल्या 510 चौ.मी. जागेत खैरापाडा उड्डाण पुलामुळे बाधित झालेल्या लोकांनी त्याच भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात गाळे बांधले असून त्यांचाही व्यावसाय सुरु आहे. हे बाधित लोक कायम स्वरूपी ही जागा मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत.
एकीकडे सिटीझन फोरम ऑफ बोईसर तारापूर हे ट्रक टर्मिनल अधिकृतपणे सुरु व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. ट्रक टर्मिनल सुरु करण्याकरिता जरी आदेश आले तरी तारापूर एमआयडीसीमधील कारखाने या ट्रक टर्मिनलपासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर असल्याने मालवाहतूक गाड्या या कारखान्यातील माल भरण्यासाठी कारखान्यांसमोरच उभ्या केल्या जातात. त्यातच ट्रक टर्मिनलची क्षमता अवघ्या 150 मालवाहू वाहनांची असल्याने जागोजागी वाहने उभी केल्याने रहदारीच्या निर्माण होणार्‍या समस्या अधिक जटिल बनल्या आहेत.
औद्योगिक परिसरात रस्त्यालगत वाहने उभी राहत असल्याने नागरिकांना, कामगारांना प्रवास करणे अवघड बनले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून हे वाहनतळ पूर्ववत सुरु करण्याचे मागणी जोर धरत आहे. त्याचप्रमाणे वाहनतळाची क्षमता वाढवून औद्योगिक परिसरातील सर्व वाहने वाहनतळात उभी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.