तारापूर : वर्षा ऑर्गेनिक्स कंपनीत भीषण स्फोट, 4 कामगार जखमी

0
2590

वार्ताहर/बोईसर, दि. 28 : तारापुर औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) अपघातांची मालिका सुरुच असुन आता वर्षा ऑर्गेनिक्स या रासायनिक कारखान्यात सोमवारी रात्री झालेल्या स्फोटात 4 कामगार जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की औद्योगिक वसाहतीच्या सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील परिसर स्फोटाच्या धक्क्याने हादरला. या स्फोटात जखमी झालेल्या चौघांपैकी दोघे गंभीर जखमी असुन त्यांना मालाड येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

औद्योगिक क्षेत्रातील एन-154 या प्लॉटवर वर्षा ऑर्गेनिक्स हा रसायनाचे उत्पादन घेणारा कारखाना असुन सोमवारी रात्री 12:10 वाजताच्या सुमारास कंपनीत हा स्फोट झाला. या घटनेबाबत माहिती मिळताच तारापूर औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच आगीतून पाच कामगार जीव मुठीत धरून बाहेर पडले. तर काही वेळानंतर आणखी दोघे कामगार गंभीर जखमी अवस्थेत बाहेर पडले. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पोलिसांनी आपल्या वाहनातूनच जखमींना बोईसरमधील तुंगा रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये 2 किरकोळ तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सुपरवायझर सुधीर धुमाळ व ऑपरेटर प्रमोद भगत अशी दोघांची नावे असुन त्यांच्यावर मालाड येथील तुंगा रुग्णालयात अधिक उपचार सुरु असल्याचे समजते.

कारखान्याच्या नावात गोंधळ
दरम्यान, या अपघातानंतर कंपनीच्या नावात मोठा गोंधळ असल्याचे समोर आले असुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वर्षा ऑर्गेनिक्स, कंपनीच्या पाणी बिलावर विनस केम इंडस्ट्रीज तर कारखान्यामध्ये सापडलेल्या कागदपत्रांवर सेरिगो एडिटीव्हज प्रा. लि. (एन-154) अशी तीन विविध नावे आढळून आली आहेत. त्यामुळे विविध नावांचा वापर करुन येथील कारखानदार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला अंधारात ठेऊन उद्योग करत असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे.