दि. 27 : भारतीय राज्यघटनेतील प्रकरण 3 मधील कलम 19 अन्वये देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळालेला आहे. या अधिकाराचा खर्या अर्थाने वापर करायचा असेल तर योग्य आणि पुरेशी माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. यातूनच आपल्याला माहितीचा अधिकार मिळाला. आणि म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये सक्षम नागरिक म्हणून जगण्यासाठी प्रत्येकाने भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे, लोकशाही व्यवस्था समजून घेतली पाहिजे आणि माहितीच्या अधिकारासारख्या अस्त्रांचा प्रभावी वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी श्रॉफ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना केले. चिंचणी स्थित के. एल. श्रॉफ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कोसबाड येथील कृषी संशोधन केंद्र येथे 3 दिवसांचे ग्रामीण विकास योजनेचे निवासी शिबीर आयोजीत करण्यात आले असून या शिबीरार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी जोशी यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी जोशी यांनी शिबीरार्थींना भारतीय राज्यघटना व माहितीचा अधिकार या विषयाची तोंडओळख करुन दिली.