प्रतिनिधी :
जव्हार, दि. 23 : जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी गोधडी शिवणे प्रशिक्षण योजना जिल्हा परिषद व महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असुन आजपासुन जव्हारसह जिल्ह्यातील 5 तालुक्यामंध्ये ही प्रशिक्षण कार्यशाळा सुरु करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत तयार झालेल्या गोधड्या जिल्ह्यातील तीव्र कमी वजनाच्या बालकांना पुरविण्यात येणार असून याद्वारे सदर महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून त्यांना सक्षम करण्याचा मानस जिल्हा परिषदेचा आहे. गरिब व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याने येथील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे. 23 ते 25 जानेवारीदरम्यान जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा, डहाणू आणि तलासरी येथील प्रथमिक आरोग्य केंद्र कार्याक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व निवडक आशा कार्यकर्तींना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जव्हार तालुक्यातील जामसर, साखरशेत, साकुर आणि नांदगाव या चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्तींसह पाचही तालुक्यांमध्ये आजपासुन या प्रशिक्षण कार्यशाळेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जेवनोन्नती अभियान (उमेद) यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार असुन प्रशिक्षकांसोबतच गावातील 2-3 जेष्ठ महिला ज्यांना गोधडी शिवण्याचा अनुभव आहे, त्यांनाही प्रशिक्षण देण्यासाठी निवडण्यात येणार आहे. दरम्यान, या गोधडी प्रकल्पाचे 26 जानेवारी रोजी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
जव्हार तालुक्यातील गोधडी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, आरोग्य अधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षीका, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच येथील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठी धानोशी येथील स्वयंसहायता बचत गटातील महिलांना यापूर्वीच प्रशिक्षण देवून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले असुन या महिला अन्य प्रशिक्षणार्थी महिलांना प्रशिक्षण देणार आहेत.