ज्योतिष म्हणजे स्वप्न विकण्याचा धंदा –  आण्णा कडलस्कर

0
2262
IMG-20180513-WA0043प्रतिनिधी
            वाडा, दि. १३ :  भूत-समंध-हाडळ, चमत्कार, जादू या मनोलकल्पीत गोष्टी असून यातून केवळ माणसांत भीती निर्माण होते. भितीतून केलेली कृती बुध्दीला गहाण ठेवते व जिथे बुध्दीला गहाण ठेवून कृती होते ती कृती केवळ अंधकृती असून ही अंधता माणसाला सर्वनाशाकडे घेऊन जाते. लाखो मैल दूर असणारे ग्रह माणसाच्या जीवनावर परिणाम करतात ही ज्योतीषांनी स्वताःच्या उदरनिर्वाहासाठी काढलेली भ्रामक कल्पना असून ज्योतिष म्हणजे केवळ स्वप्न विकण्याचा धंदा असल्याचे प्रतिपादन डाॅ. नरेंद्र दाभोलकर प्रणित अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पालघर जिल्हा शाखेचे सदस्य आण्णा कडलस्कर  यांनी केले. ते शिरीषपाडा येथे अविष्कार छंदवर्ग आयोजित “चला डोळस बनूया” या उपक्रमा प्रसंगी बोलत होते. 
             ग्रामीण भागात प्रथमचं आयोजीत केलेल्या अविष्कार छंदवर्ग या उन्हाळी शिबीरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून शनिवारी (ता. १२) “चला डोळस बनूया ” या उपक्रमांतर्गत अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  अंनिसचे आण्णा कडलस्कर यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना अंधश्रध्देची पोलखोल करून दाखवली. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाचा मुलांनी मनमुराद आनंद घेतलाचं पण स्वतःही प्रयोग करून, आपणही बुवाबाजीची पोलखोल करण्यास सज्ज आहोत असा विश्वासही व्यक्त केला.
            यावेळी उपस्थित मान्यवरांनी अविष्कार छंदवर्गाचे मनभरून कौतुक केले, ‘केवळ छंद नव्हे तर मुलांच्या एकूणचं व्यक्तीमत्व विकासासाठी व मुलांच्या वैचारीक दिशादर्शनासाठी अविष्कार छंदवर्ग एक भरीव योगदान देत आहे’ अशी प्रतिक्रिया पालक प्रमोद पाटील यांनी दिली. तसेचं ‘श्रध्दा-अंधश्रध्दा या प्रवाही असून त्या एका कडून दुस-याकडे वाहत आलेल्या आहेत. या श्रध्दा-अंधश्रध्दाकडे डोळसपणे पाहूनचं त्या स्विकाराव्यात मुलांना लहानपणीचं त्यातील फोलपणा स्पष्ट करून सांगीतल्यास हा अंधश्रध्देचा प्रवाह आपण खंडीत करू शकतो. अविष्कार छंदवर्गाने यासाठी पहिलं पाऊल उचललेलं आहे अशी प्रतिक्रिया डाॅ. भाई वलटे यांनी दिली.
           या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे रूपेश पाटील, अभ्यास अॅकॅडमीचे संचालक वैभव पाटील सर, पत्रकार वैभव पालवे, ब्लाॅसम इंग्लिश स्कूलच्या नीलम गोळे मॅडम, प्रवर्तक फाऊंडेशनचे निहेश गायकवाड यांसह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबीरार्थीं जान्हवी गायकर हिने , पाहुण्यांचे स्वागत शिबीरार्थीं प्रांजल पाटील हिने तर आभार प्रदर्शन आर्या पाटील हिने केले.