पालघर, दि. 1 : वाणगावमधील एका 20 वर्षीय तरुणाची गुगल पे च्या नावाखाली 1 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच आता जव्हारमधील एका तरुणाला ऑनलाईन शॉपिंग करणे महागात पडले आहे. रिफंडच्या नादात ऑनलाईन फसवणूक करणार्या टोळीने त्याच्या बँक खात्यातून 28 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहतीनुसार, जव्हार येथील एका 29 वर्षीय तरुणाने क्लब फॅक्टरी या ऑनलाईन शॉपिंग अॅपवरुन 7 जुलै रोजी 488 रुपये किंमतीचे पॉवर बँक मागवले होते. मात्र त्याला मिळालेले पार्सल त्याने ऑर्डर केलेल्या उपकरणापेक्षा वेगळे असल्याने ते त्याने पुन्हा परत केले होते. दरम्यान अनेक दिवस उलटूनही रिफंड न मिळाल्याने त्याने गुगलवरुन क्लब फॅक्टरी कंपनीच्या कस्टमर केअरचा फोन नंबर मिळवला. दुदैवाने त्याने मिळवलेला फोन नंबर ऑनलाईन फसवणूक करणार्या टोळीचा असल्याने फोनवर बोलणार्या तोतया कस्टमर केअरच्या कर्मचार्याने रिफंड प्रक्रियेच्या नावाखाली त्याच्या बँक एटीमची संपुर्ण माहिती जाणून घेतली. यानंतर तरुणाला काही कळायच्या आतच त्याच्या खात्यातून 27 हजार 998 रुपये डेबिट झाल्याचा मॅसेज आला.
आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्याने जव्हार पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 419, 420, 66ए, 66डी प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे.
वसईतील युवकाला 2.80 लाखांचा गंडा
वसईतील एका 25 वर्षीय युवकालाही इन्स्टाग्रामवरुन परदेशी तरुणीशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवर मार्था एडम्स नामक तरुणीचे बनावट अकाऊंट वापरणार्या एका युझरने सदर तरुणाशी आपण अमेरिकेतील रहिवासी असल्याचे सांगून मैत्री केली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्यानंतर सदर युझरने आपण तुला अमेरिकेतून भेटवस्तू पाठवत असुन ती मिळविण्यासाठी तुला कर स्वरुपात काही रक्कम भरावी लागेल अशी बतावणी केली व धिरज कुमार (आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक- 244401001442) व लल्ला कुमार सिंह (आयसीआयसीआय बँक खाते क्र-740901500272) यांची नावे व खातेक्रमांक दिले. भेटवस्तूच्या लालसेपोटी सदर तरुणाने कोणतीही शहनिशा न करता दोन्ही खात्यांमध्ये एकुण 2 लाख 80 हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली. यानंतर आठवडा उलटूनही भेटवस्तु न मिळाल्याने व सदर क्रमांकवर संपर्कही होत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.