mahanews MEDIA
डहाणू दि. ११: डहाणू येथून प्रसिद्ध होणाऱ्या गुजराती साप्ताहिक जनशाहीचे संपादक पंकज सोमैय्या यांना राज्य महिला आयोगाने १२ एप्रिल रोजी सुनावणीकरीता हजर रहावे असे समन्स बजावले आहे. मुंबई स्थित एका महिलेने महिला आयोगाकडे तक्रार नोंदविली असून या तक्रारीमध्ये सोमैय्या यांनी ४ मार्च २०१८ रोजीच्या अंकात डहाणूतील उमंग ठक्कर या युवकाबाबत बातमी प्रसिद्ध करताना तक्रारदार महिलेबाबत बदनामीकारक मजकूर दिल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. ही बातमी प्रसिद्ध करताना सोमैय्या यांनी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडीयाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग केला असून त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी पिडीत महिलेने मुंबई पोलीस व डहाणू पोलीसांकडे केली होती. याप्रकरणी महिला आयोगाने पोलीसांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे पोलीसांनी पंकज सोमैय्या यांची चौकशी केली आहे. उद्या (१२) पोलीस आपला चौकशी अहवाल महिला आयोगाकडे सादर करतील. सोमैय्या यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. या नंतर महिला आयोग काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालघर जिल्ह्यातून एखाद्या पत्रकाराला महिला आयोगाकडून समन्स बजावले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Share on:
WhatsApp