विशेष प्रतिनिधी :
कुडूस, दि. 18 : बोईसर येथील कॅम्लिन कोकियो कंपनीने रविवारी (दि.16) पालघर जिल्ह्यातील माध्यमिक कलाध्यापकांची कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी कंपनीच्या मालकांनी कलाध्यापकांना रंगांविषयी विशेष माहिती दिली.
या कार्यशाळेसाठी पालघर जिल्ह्यातील 80 कलाध्यापक उपस्थित होते. कंपनीच्या वतीने सर्व शिक्षकांना विविध प्रकारचे रंग, ब्रश, कागद, सिस्पेन्सिल आदी साहित्य देवून रंगकाम करण्यास सांगितले. याच वेळी रंगांसंबंधी विशेष चर्चा करून कॅम्लिनचे रंग कसे दर्जेदार असतात हे पटवून दिले. कार्यशाळेच्या सुरुवातीला कंपनीचे व्यवस्थापक संदेश आचरेकर, अजित राणे, अमी पेठकर व सुनिल टेमकर यांनी शिक्षकांचे स्वागत करून माहिती दिली. तसेच यावेळी झालेल्या चर्चेतून कलाध्यापकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कंपनी आपले उत्पादन दर्जेदार बनविते या विषयी कुठलीही तडजोड केली जात नाही, असे आचरेकर यांनी यावेळी सांगितले.
सतीश तांबे यांनी पोट्रेटचे प्रात्यक्षिक करून दाखवले तर जोगमार्गे, चामरे, कवळे व विनय पाटील यांनी नव्या रंगाचे प्रात्यक्षिक दाखविले. शेवटी आभार व्यक्त करून कंपनी व्यवस्थापकांनी सर्व शिक्षकांना रंग भेट दिले.