राजतंत्र न्यूज नेटवर्क

गेल्या अनेक वर्षांपासून बाबुभाईंनी स्वतःला पूर्णवेळ समाजकारणात झोकून दिले होते. आरोग्य व शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान लाभले होते. त्यांना कुटूंबाकडून समाजकार्यासाठी मोकळीक व सर्वतोपरी सहकार्य मिळत गेले. अनेक दानशूर लोक व संस्थांचा बाबुभाईंवर पूर्णपणे विश्वास होता. बाबुभाईंमार्फत देणगी व मदत गरजवंतापर्यंत योग्य तऱ्हेने पोहोचेल याची खात्री त्यांना होती. यातून बाबुभाई शेठीया नावाचा समाजसेवेतील मोठा वटवृक्ष तयार झाला. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कर्करोग तपासण्या यासह आरोग्य क्षेत्रात अनेक सेवा गरजवंतांपर्यंत पोचविण्यात बाबुभाईंनी स्वतःचा देह झिजवला. गेल्या अनेक वर्षांपासून ते अहोरात्र हे कार्य करीत असत. आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असतानाच आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्वरेने त्यांना डॉ. देव यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
बाबुभाई हे विज्ञान शाखेतील पदवीधर होते. त्यांनी ४५ एकर जागेवर निलगिरी वृक्षाच्या ७५ हजार रोपांची लागवड करुन वनशेतीचा प्रयोग यशस्वी केला. त्यांच्या या पर्यावरण पोषक वनीकरण उपक्रमाचे महत्व ओळखून १९९२ साली महाराष्ट्र शासनाने पर्यावरण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा वनश्री पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या हस्ते या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या खात्यात अनेक पुरस्कारांचे मानाचे तुरे जमा झाले. अलीकडेच त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्काराने गौरवण्यात आले.
बाबुभाई हे अनेक संस्थांचे प्रेरणास्थान होते. हसतमुख उर्जामय व्यक्तिमत्त्व, शेरोशायरीने व्यापलेले त्यांचे भाष्य कुठल्याही कार्यक्रमात कार्यकर्त्यांना समाजसेवेचे बळ देणारे ठरत होते. आणि यामुळेच बाबुभाईंची अकाली एक्झिट सर्वसामान्यांसाठी वेदनादायी ठरली आहे.