शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते प्रकाश निकम यांचा ना’राजीनामा’

0
3641
  • पक्ष सदस्यत्वही सोडले
  • पक्षाने उमेदवारी डावलल्याची खंत

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 2 : आगामी विधानसभा निवडणूकीत विक्रमगड मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे शर्तीचे प्रयत्न करुन देखील डावलले गेल्याचा आरोप करत प्रकाश निकम यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वाबरोबरच पालघर जिल्हा परिषद गटनेते पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठविला आहे. निकम यांच्या राजीनाम्यामुळे विक्रमगडमधील शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली असून निकम यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली होती.

मोखाडा पंचायत समितीवर सन 2000 पासून आजतागायत शिवसेनेचा भगवा फडकविण्यात निकम यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच मोखाडा नगरपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यासाठीही त्यांचे योगदान मोठे आहे. असे असताना पालघर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीत पक्षानेच माझा पराभव केला. तसेच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी निवडीच्या वेळी पक्षानेच मला प्रचंड विरोध केला. विधानसभेसाठी युती झाल्यावर तुम्हालाच उमेदवारी देऊ, असा शब्द पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यावेळी दिला होता. परंतू तो शब्दही पाळला गेला नाही. पक्ष वाढीसाठी अहोरात्र काम करूनही पक्षाकडून मला वेळोवेळी अशी सापत्न वागणूक देऊन डावलण्यात येत असल्याने मी माझ्या पक्ष सदस्यत्वाचा आणि जिल्हा परिषद गटनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे निकम यांनी पक्ष प्रमुखांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात नमुद केले आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली असून निकम समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली आहे. या ना-राजीनामा नाट्यानंतर निकम आता कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच प्रकाश निकम यांनी अगदी सहजपणे हा राजीनामा दिलेला दिसत असला तरी आता भाजप उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांची डोकेदुखी वाढणारा हा राजीनामा ठरण्याची शक्यता आहे. परिणामी विक्रमगड विधानसभेची यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार?
निकम यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता, आपण उद्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून विक्रमगड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.