डहाणू दुहेरी हत्याकांडातील आरोपीला तिहेरी जन्मठेप

0
6986
  • अन्य एका आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता
  • पालघर सत्र न्यायालयाचा निकाल

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 20 : तालुक्यातील बावडा येथील आपल्या चिकूच्या वाडीतील बंगल्यात राहणार्‍या इराणी दांपत्याच्या घरी दरोडा घालून धारदार शस्त्राने दोघांची हत्या करणारा आरोपी मोहमद रफीक आदम शेख उर्फ रवी रामखिलावनसिंग ठाकूर याला काल, गुरुवारी पालघर सत्र न्यायालयाने तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी भगवानलाल मोहनलाल कुमावत याची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर 2014 रोजी अज्ञात दरोडेखोरांनी बावडा येथील अरदेशर इराणी (वय 76) व नर्गिस इराणी (वय 74) यांच्या चिकूच्या वाडीतील बंगल्यात घुसून घरातील सुमारे 15 ते 20 हजारांची रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लुटून पोबारा केला होता. तसेच या लुटमारीस विरोध करणार्‍या इराणी दांपत्याची काठीने डोक्यावर प्रहार करुन व धारदार कटरने गळा चिरुन हत्या केली होती. या घटनेमुळे संपुर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ माजली होती.

दरम्यान, सुरेखा सुरेश पारधी यांनी वाणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात दरोडा व हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यांचा तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक अरुण फेगडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकांत साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीने व शिताफीने तपास करुन मोहम्मद शेख व भगवानलाल कुमावत (दोघे रा.सुरत) यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तसेच त्यांच्याविरोधात सबळ पुराव्यानिशी पालघर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

हे प्रकरण न्यायालयापुढे सुनावणीसाठी आले असता, फिर्यादी पक्षातर्फे एकूण महत्त्वाच्या 27 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. तर सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. डी. आर. तरे यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची क्रुरता लक्षात घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर तोंडी व लेखी स्वरूपातील पुरावे ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी आरोपी मोहम्मद शेख याला दोषी ठरवून तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर दुसरा आरोपी भगवानलाल मोहनलाल कुमावत याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.