
डहाणू दि. २३: जिल्हा परिषदेच्या डहाणू तालुक्यातील कंक्राडी व नंडारे (डोंगरीपाडा) शाळेतील ७२ विद्यार्थ्यांनी सलग २०१ सुर्यनमस्कार घालून दाखवले आहेत. कंक्राडी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी ३३ मिनिटे ११ सेकंदात हे सुर्यनमस्कार घातले. पतंजली योग शिक्षिका सौ. सुषमा चौधरी यांनी विशेष परिश्रमाने विद्यार्थ्यांना सुर्यनमस्काराचे धडे दिले आहेत. त्यांनी स्वतःही विद्यार्थ्यांसमवेत सुर्यनमस्कार केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे पतंजली योग समितीतर्फे मेडल देऊन कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात कंक्राडी शाळेच्या मुख्याद्यापिका मंगला सावंत, शिक्षिका रत्नप्रभा केणी, नंडारे – डोंगरीपाडा शाळेचे पुंडलिक सोलनकर, पतंजली योग समितीचे पदाधिकारी उत्तम सहाणे, इंदिरा कुंतावाला, भगवान पाटील, प्रभाकर जंगम, रचना बारी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना ४० सुर्यनमस्कारानंतर १ मिनिटाची विश्रांती देण्यात आली. पतंजली योग समितीमार्फत शाळकरी विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार व योगासने शिकवून आरोग्याचा मूलमंत्र दिला जात आहे.
