
दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 18 : राज्यातील औषधनिर्माण अधिकार्यांच्या पदोन्नती, 6 व्या वेतन आयोगातील ग्रेड वेतन, सिलेक्शन ग्रेड प्रणाली लागू करणे, एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी तसेच सरळ सेवा भरती नियमात सुधारणा करणे आदी मागण्यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. प्रलंबित मागण्यांच्या परिपुर्तीसाठी महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब औषध निर्माण अधिकारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष भिमराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नुकतीच आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर टोपे यांनी सकारात्मक भुमिका घेऊन आरोग्य संचालकांना (पुणे) तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

महासंघाचे अध्यक्ष घोरपडेंसह कार्याध्यक्ष कुणाल मंगळे, प्रतिनिधी गजानन फाले, संतोष सोनटक्के, संजय काळे व इंगेवार यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्या जालना येथील निवासस्थानी त्यांनी भेट घेऊन मागण्यांबाबतचे निवेदन दिले. तसेच यावेळी झालेल्या चर्चेत औषधनिर्माण अधिकार्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या सादर करताना, आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागात कार्यरत असणार्या औषध निर्माण अधिकार्यांच्या सरळ सेवा भरती नियमात आज 30 वर्ष झाली तरी सुधारणा करण्यात आलेली नाही. ग्रामविकास विभागात कार्यरत असलेल्या औषधनिर्माता या संवर्गाचे सर्व नियंत्रण सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत पदनिर्मिती, सरळ सेवा भरती नियम, या सर्व बाबी नियंत्रित करण्यात येत असून त्यांचे वेतन व भत्ते सुध्दा आरोग्य विभागामार्फत देण्यात येत आहे. तसेच दोन्ही विभागातील औषधनिर्माण अधिकार्यांची सेवा जेष्ठता यादी आजतागायत प्रसिध्द करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय येथे पुणे आरोग्य सेवा संचानालयाचे सहसंचालक यांनी औषध निर्माण अधिकारी यांच्या कर्तव्य आणि जबाबदारी व सरळ सेवा भरती नियमात सुधारणा करून प्रस्ताव आरोग्य विभागातील सेवा 5 मंत्रालय सन 2017 ला संचालक, आरोग्य सेवा मुंबई व अभियान संचालक यांच्या मंजुरीसह सादर करण्यात आला असून सदर प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. शिवाय औषधनिर्माण अधिकार्यांना संपूर्ण सेवा कालावधीत एकही पदोन्नतीचे पद आरोग्य विभागाने निर्माण केले नाही याकरिता निवेदन देऊन औषधनिर्माण अधिकार्यांवर 6 व्या वेतन आयोगामध्ये करण्यात आलेल्या ग्रेड वेतनावरील अन्यायाचा आलेख आरोग्य विभागाच्या वतीने कसा सुरू असून याची सविस्तर माहिती आरोग्यमंत्र्यांना देताना सर्व पुरावे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून औषधनिर्माण अधिकार्यांना वैद्यकीय शिक्षण विभागात अस्तित्वात असलेली सिलेक्शन ग्रेड प्रणाली लागू करण्यात यावी, त्यांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी तसेच शासनस्तर व ग्रामविकास विभागातील कार्यरत औषधनिर्माण अधिकार्यांची एकत्रित सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना देताना कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालकांना दिले.
दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी संघटनेच्या मागण्यांवर सकारत्मक निर्णय घेतल्यामुळे संघटनेने त्यांचे आभार व्यक्त करून सर्व औषधनिर्माण अधिकारी आपल्या सेवेत कोणतीही कसूर न करता योग्य प्रकारे काम करून आरोग्य सेवेचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न करतील, असे आश्वासन दिले.