
प्रतिनिधी/डहाणू, दि. 17 : पालघर जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीवर स्पष्टीकरण देताना जिल्ह्याला व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करणार असल्याचे आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी दिले. जिल्ह्यातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी नालासोपारा येथील शिवसेनेच्या नवीन दुबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आलेल्या खा. गावित यांना कु. पूजा अरुण कट्टी या युवतीने याबाबत तक्रार केली होती.

युवती सेनेची नालासोपारा-विरार विधानसभा समन्वयक पूजा हिने खा. गावित यांना लेखी स्वरूपात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2003 च्या तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार शाळेच्या गेटपासुन 100 यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याची तरतूद तसेच 200 रुपये दंड आकरण्याची सोय असताना देखील स्थानिक प्रशासन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. 24 नोव्हेंबर 2019 रोजी पूजाने यासंबंधीच्या अधिकृत संकेतस्थळावर पुराव्यांसहीत निवेदन सादर केले व त्याचा पाठपुरावा देखील केला; परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे तसेच सामान्य नागरिकांच्या तक्रारीला प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही तिने निवेदनातून केला आहे. प्रशासन नेहमी सांगते की एखाद्या कायद्याच्या अंमलबजावणीत सामान्य नागरिकांचा सहभाग हवा; परंतु येथे चित्र उलटे दिसत असल्याचे स्पष्ट मत पूजा कट्टी हिने खा. गावित यांच्याकडे मांडले. पालघर जिल्हा कुपोषणाने ग्रस्त असताना देशाची भावी पिढी व्यसनांच्या आहारी जात असताना प्रशासनाने सदर कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरतेने करणे आवश्यक असून याप्रकरणी आकारला जाणारा दंड 200 रुपयांवरून 5 हजार रुपये करावा, जेणेकरुन अशा अनैतिक प्रकाराला आळा बसवता येईल, अशी सूचनाही तिने मांडली.
यावर व्यसनमुक्त पालघर! सक्षम पालघर! करण्यासाठी तरुणांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढायची मोठी जबाबदारी प्रशासनावर तसेच जागृत नागरिकांवर आहे, यासाठी मी स्वतः लक्ष घालून ही गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे आश्वासन खा. गावित यांनी उपस्थित नागरिकांना दिले.