मनोर येथे दिड कोटींचे दोन मांडूळ प्रजातीचे साप जप्त, दोघे अटकेत

0
14884
संग्रहित छायाचित्र

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मनोर, दि. 3 : काळी जादू व औषधासाठी वापरले जाणारे दुर्मिळ असे मांडूळ प्रजातीचे दोन साप पालघर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले असुन बाजारभावानुसार या सापांची किंमत दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. याप्रकरणी सुनील पांडुरंग धानवा (वय 46) व पवन शंकर भोया (वय 39) अशा दोघांना अटक करण्यात आली असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मनोरमधील गोवाडे भागात राहणार्‍या सुनील धानवा व पवन भोया यांनी कोणत्याही परवानगी शिवाय दोन मांडूळ प्रजातीचे दुर्मिळ साप पाळले असल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार काल, मंगळवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास पोलीसांनी येथे छापा टाकत एक 53 इंच लांबीचा व 4 किलो वजनी तर दुसरा 41 इंच लांबीचा व 1 किलो वजनी असे एकुण दोन मांडूळ साप जप्त केले असुन या मांडूळांची बाजारात अंदाजे 30 लाख रुपये प्रतिकिलो किंमत असुन यानुसार एकुण दिड कोटी रुपयांचा मुद्दमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीसांनी दिली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना रात्री 10.30 च्या सुमारास अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये वन्यजिव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39(3) सह कलम 51 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.