करमतारा इंजिनिअरिंग : कामगाराच्या नुकसानभरपाईपोटी तातडीने साडे नऊ लाख जमा केले

0
2198

बोईसर, दि. 3 ऑगस्ट: बोईसरस्थीत करमतारा इंजिनिअरिंग प्रा. लि. कारखान्यातर्फे काल (2 सप्टेंबर 2020) 5 बोटे गमावलेल्या कंत्राटी कामगाराच्या नुकसानभरपाईसाठी साडे नऊ लाखांची रक्कम ठाण्याच्या कामगार आयुक्त कार्यालयात जमा झाली आहे. तब्बल साडे तीन महिन्यानंतर त्याला हक्काची नुकसानभरपाई मिळण्याची महत्वाची प्रक्रीया महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. तातडीने त्याचे बॅन्केत खाते देखील उघडण्यात आले आहे. mahanews.com ने ह्या प्रकरणाची झाडाझडती सुरु केली होती. पोलीस, कामगार उपायुक्त, कारखाना निरीक्षक यांच्याकडे चौकशी सुरु केली होती. काल ” करमतारा इंजिनिअरिंगच्या मालकांवर फौजदारी कारवाई होणार! – औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची ग्वाही; कामगार उपायुक्त किशोर दहिफळकरांची भूमिका संशयास्पद!” अशा मथळ्याखाली बातमी देखील (2 ऑगस्ट 2020) प्रसारित केली होती.

अकबर जलाद सय्यद ह्या 19 वर्षीय कंत्राटी कामगाराचा 20 मे 2020 रोजी मशिनमध्ये हात अडकल्याने झालेल्या अपघातात उजव्या हाताची 5 बोटे निकामी झाली होती. अकबरला केवळ 5 हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्याची बोळवण करण्यात आली होती. त्यानंतर अकबर त्याच्या विधवा आईसह न्यायासाठी बोईसरच्या कामगार उपायुक्त कार्यालयात फेऱ्या मारत राहिला. 10 जुलै नंतर माध्यमांच्या नजरेस पडला. प्रकरण शांत करण्यासाठी त्याला दरमहा 12 हजार रुपये पगार सुरु करण्यात आला. मे व जून चा एकत्रित पगार जुलैमध्ये देण्यात आला. अकबरला 8 लाख रुपये नुकसानभरपाई दिल्याचा दावा देखील करमतारा व्यवस्थापनातर्फे करण्यात आला होता.

प्रत्यक्षात प्रकरणाचा मागोवा घेतल्यानंतर करमतारा व्यवस्थापनातर्फे कुठलीही नुकसान भरपाई दिली गेली नसल्याचे व कामगार आयुक्तांकडे कुठलीही अनामत जमा नसल्याचे, करमताराच्या विरोधात कुठलीही फौजदारी कारवाई न झाल्याचे आणि कामगार उपायुक्तांनी कंत्राटदारावर कुठलीही कारवाई न केल्याचे वास्तव समोर आले. आता मात्र अकबरची नुकसानभरपाई कामगार आयुक्तांमार्फतीने खात्रीशीरपणे त्याच्या बॅन्क खात्यातच जमा होणार आहे. काल तातडीने ह्या प्रक्रीया पूर्ण झाल्या आहेत.