शेतकर्‍यांच्या भारत बंदला पालघर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद; बाजारपेठा मात्र कडकडीत बंद

0
2285

पालघर, दि. 8 : नव्या कृषी विधेयकांविरोधात शेतकर्‍यांमार्फत आज, 8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पालघर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. व्यापार्‍यांनी या बंदला पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसुन आला. तर काही भागांमध्ये रिक्षा, एसटी बसेस व खाजगी वाहने रस्त्यांवर दिसुन आली. बोईसर औद्योगिक वसाहतीतील बहूतेक कारखाने सुरु ठेवल्याने सकाळच्या सुमारास पायी मार्गक्रमण करत येथील अनेक कर्मचार्‍यांनी आपले कारखाने गाठले. या बंदमधुन अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली होती. तर, बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक त्या भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  • वाड्यात कडकडीत बंद
    या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून कृषी विधेयकाचा विरोध करण्यासाठी काल शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या वतीने वाडा बंदची हाक दिल्याने आज मंगळवारी सकाळपासून व्यापार्‍यांनी आपली दुकाने व आस्थापने बंद ठेवली होती. यात वाडा आगारच्या बसही काही काळ बंद ठेवल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले.