बोईसर : करोनावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेऊन त्याची मुळ किंमतीपेक्षा चढ्या दराने विक्री करणार्या एका टोळीला नाशिक पोलिसांनी नुकतेच गजाआड केले असुन आतापर्यंत याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या टोळीचा मुख्य सुत्रधार बोईसरमधील रहिवासी असल्याचे व तो रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन घेणार्या कमला लाईफ सायन्सेस या कंपनीत कार्यरत असल्याचे समोर आल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सोशल मिडीयावर कंपनीचा यात सहभाग असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्याने कंपनीतर्फे याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच अशा पोस्ट व्हायरल करणार्यांवर कारवाईसाठी सायबर सेलकडे तक्रार नोंदवण्यात आल्याचेही म्हटले आहे. तर दुसरीकडे नाशिक पोलिसांनी देखील कंपनीला क्लिनचिट दिल्याचे समजते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नाशिकमधील के. के. वाघ महाविद्यालयाजवळ दोन तरुणींना रेमडेसिविरचे दोन इंजेक्शन 54 हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करत असताना अन्न व औषध प्रशासन आणि आडगाव पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडले होते. यानंतर त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर दोन साथिदारांनाही अटक करण्यात आली. श्रुती रत्नाकर उबाळे (वय 21), जागृती शरद शार्दूल (वय 21, दोघी रा. जत्रा हॉटेल चौफुली, नाशिक), स्नेहल अनिल पगारे (वय 22, रा. शांतीनगर, मनमाड) व कामेश रवींद्र बच्छाव (रा. उदय कॉलनी, नाशिक) अशी त्यांची नावे आहेत. या चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर, चौकशीदरम्यान, ही इंजेक्शन्स पालघर येथून आणल्याची कबुली त्यांनी दिली. आडगाव पोलिसांनी लागलीच पालघर गाठत या काळाबाजारीचा मुख्य सुत्रधार व कमला लाईफ सायन्सेस कंपनीचा कर्मचारी सद्धेश अरुण पाटील (वय 22, रा. उमरोळी) याला ताब्यात घेतले. अधिक तपासादरम्यान, रोहित राजेंद्र मुठाळ (वय 23, नाशिक), सुनील किसनलाल गुप्ता (वय 33, रा. विरार), महेश खंडू पाटील (वय 20, रा. वसई) व अभिषेक दामोदर शेलार (वय 24, रा. वाडा) अशा 9 जणांना ताब्यात घेतले. तर नुकतीच या प्रकरणात पोलिसांनी देवेन नाईक (21, रा. बोईसर) यालाही अटक केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या 10 वर पोहाचली आहे.
- कंपनीचा खुलासा
या काळाबाजार प्रकरणात बोईसरमधील कमला लाईफ सायन्सेस या कंपनीचे नाव समोर आल्यानंतर कंपनीविरोधात वातावरण तापू लागले होते. त्यामुळे कंपनीतर्फे याबाबत खुलासा करण्यात आला असुन या काळाबाजारात कंपनीचा कोणत्याही प्रकारचा समावेश नाही. करोनामुळे सुरक्षारक्षकांकडून कर्मचार्यांची फिजिकल चेकिंग शक्य नसल्याने संबंधित कर्मचार्याने याचा फायदा घेत इंजेक्शन चोरी केल्याचे व ते काळाबाजात विक्री केल्याचे म्हटले आहे. तसेच यासंदर्भात सोशल मिडीयावर चुकीची माहिती पसरवून कंपनीची बदनामी करणार्याविरोधात पालघर सायबर सेलकडे तक्रार नोंदवली असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
कंपनीला पोलिसांची क्लिनचिट?
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्धेश पाटील हा कमला लाईफ सायन्स या कंपनीतील कर्मचारी आहे. मात्र कंपनीचा या प्रकरणाशी संबंध नाही. सिध्देशने संधी साधत अंतर्वस्त्रात इंजेक्शन लपवत कंपनीच्या बाहेर आणून त्याची विक्री केल्याची कबुली दिली आहे. नाशिक येथून 20 तर बोईसर येथून 63 इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती आडगांव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी दिली असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तापत्रातून देण्यात आले आहे.