अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली

0
2871
व्यापाऱ्यांना संबोधित करताना प्रांताधिकारी सौरभ कटियार व अधिकारी

दिनांक 26.03.2020: कोरोना विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर डहाणूचे प्रांताधिकारी सौरभ कटीयार यांनी अत्यावश्यक सेवादार व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी मांडलेल्या अडीअडचणींवर मार्ग काढण्याची ग्वाही कटियार यांनी दिली. यावेळी डहाणूचे तहसीलदार राहूल सारंग, उप विभागीय अधिकारी मंदार धर्माधिकारी, डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे, डहाणू तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे हितेंद्र पाटील उपस्थित होते.
कटियार यांनी व्यापाऱ्यांकडे पुरासा साठा आहे किंवा नाही याबाबतची माहिती घेतली व व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. पोलिसांच्या दंडूकेशाहीने व्यापारी त्रस्त झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पोलिस वाहन चालकांना विनाकारण मारत असल्याची तक्रार करण्यात आली. यापुढे असे प्रकार घडणार नाही अशी ग्वाही कटियार व धर्माधिकारी यांनी दिली.
व्यापाऱ्यांना व त्यांच्या आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, तसेच वाहने व वाहनचालक यांच्यासाठी सहज व सुलभ अशी ओळखपत्र व पास देण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्वरेने ओळखपत्र दिली जात असल्याची माहिती तहसीलदार सारंग यांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, चिकन, अंडी, मटण, मच्छी विक्री सुरळीत चालू राहील व पुरेशा प्रमाणात लोकांना उपलब्ध होईल यासाठी प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसले.

बैठकीला आलेले व्यापारी