
दि. 25 जून: पालघर तालुक्यातील केळवे सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू नरवडे यांना पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. केळवे पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कोळंबी प्रकल्पांतील कोळंबी चोरीच्या घटना घडल्या होत्या. कोळंबी उत्पादकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यासंदर्भात तक्रारींची दखल न घेणे नरवडेंच्या अंगाशी आले आहे. नवे पोलिस अधिक्षकांच्या ह्या कारवाईतून कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नसल्याचे संकेत मिळत असून, सर्वसामान्य लोकांचे मनोबल वाढले आहे.
16 जून रोजी जलसार येथील कोळंबी प्रकल्पातून 100 ते 125 लोकांनी खूलेआमपणे 250/300 किलो कोळंबी जबरदस्तीने चोरुन नेली होती. ही कृती दरोड्याचा प्रकार मानला जातो. घटनेबाबत अनंत गोविंद पाटील हे केळवे पोलिसांकडे फिर्याद नोंदविण्यास गेले असता, एपीआय नरवडे यांनी फिर्याद नोंदवून न घेता तक्रारी अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा 18 जून रोजी अन्य एका कोळंबी प्रकल्पामधून 13/14 लोकांनी प्रकल्पातील मजूरांना मारहाण करुन एका खोलीत डांबून ठेवले व कोळंबी चोरी केली होती. ह्या प्रकरणी देखील राहुल जगताप यांनी केळवे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यास गेले असता, नरवडे यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही.
पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे 18 जूनच्या घटनेबद्दल तक्रार गेल्यानंतर त्यांनी 23 जून रोजी रात्री 11 वाजता दरोड्याचा गुन्हा दाखल करुन त्याच रात्री 6 आरोपींना अटक केली होती. प्रथमदर्शनी केळवे पोलिस स्टेशनचे प्रभारी राजू नरवडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधिक्षकांनी त्यांना निलंबित केले आहे.