राजतंत्र न्युज नेटवर्क
दिल्ली, दि. 23 : डहाणू तालुक्यावर केंद्र सरकारने 20 जून 1991 च्या अधिसुचनेद्वारे उद्योगबंदी लादली आहे. एकीकडे डहाणूचा विकास रोखून धरला जात असताना, दुसरीकडे स्थानिकांचा विरोध डावलून वाढवण बंदरासारखे महाकाय प्रकल्प, विविध समांतर महामार्ग, रेल्वेमार्ग असे प्रकल्प जाहिर केले जात आहेत. यातुन डहाणू तालुक्यात निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने खासदार चिंतामण वणगा यांची दिल्ली येथील निवास्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या शिष्टमंडळामध्ये राजकुमार नागशेट, सुधिर कामत, जितेन संघवी, राजेश ठाकूर, दिपक कास्ट्या, विनोद स्वामी, सुशिल शहा, आनंद बाफना, धवल पटेल यांचा समावेश होता. खासदार वणगा यांनी शिष्टमंडळाबरोबर सविस्तरपणे सर्व विषयांवर चर्चा केली.
डहाणू तालुक्याला भेडसावत असणार्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने डहाणू तालुका विकास परिषद या नावाने एक समुह तयार झाला असून या समुहाकडून 1991 च्या वादग्रस्त अधिसुचनेचा अभ्यास करण्यात येत आहे. अधिसुचनेची कायदेशिर वैद्यता देखील तपासली जात आहे. खासदार वणगा हे सुरुवातीपासून 1991 ची अधिसुचना मागे घ्यावी यासाठी प्रयत्नशिल आहेत. अलिकडेच याबाबत त्यांनी नव्याने लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र केंद्र सरकारतर्फे समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. खासदार वणगा यांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी सातत्याने चालू ठेवलेल्या प्रयत्नांबद्दल शिष्टमंडळाने त्यांना धन्यवाद दिले.
या व्यतिरिक्त अनेक मुद्द्यांवर वणगा यांनी शिष्टमंडळाशी दिलखुलासपणे चर्चा केली.
Home संग्राह्य बातम्या नवी दिल्ली : डहाणू तालुक्याच्या विविध प्रश्नांवर शिष्टमंडळाने घेतली खासदार वणगांची...